(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची आतापर्यंत 9 पदकांची कमाई, पाहा विजेत्या खेळाडूंची यादी
CWG 2022 India Medal Winners: बर्मिंगहॅम (Commonwealth Games 2022) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चार दिवस उलटले आहे. आज या स्पर्धेतील पाचवा दिवस आहे.
CWG 2022 India Medal Winners: बर्मिंगहॅम (Commonwealth Games 2022) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चार दिवस उलटले आहे. आज या स्पर्धेतील पाचवा दिवस आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 9 पदकांची कमाई केलीय आहे. ज्यात तीन सुवर्णपदक, तीन रौप्यपदक आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा दबदबा पाहायला मिळाला. वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतानं आतापर्यंत सात पदक जिंकली आहेत. तर, ज्युदोत दोन पदक मिळवली आहेत. या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडू (Indian Athletes) कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
राष्ट्रकुल स्पर्धेचा दुसरा दिवस-
1) संकेत महादेव सरगर
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकते महादेव सरगरनं भारताला सर्वात पहिले पदक मिळवून दिलं. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो म्हणजे एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं
2) गुरुराज पुजारी
वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात 269 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं.
3) मीराबाई चानू
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू भारताला तिसरं पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर ठरली. तिनं महिला वेटलिफ्टिंग 49 किलो गटात एकूण 201 किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक जिंकले. मीराबाईनं स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचललं.
4) बिंद्याराणी देवी
वेटलिफ्टर बिंदियारानी देवीनं महिलांच्या 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकलंय. तिनं स्नॅचमध्ये 86 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो म्हणजे एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं. फक्त एका किलोन तिचं सुवर्णपदक हुकलं.
राष्ट्रकुल स्पर्धेचा तिसरा दिवस-
5) जेरेमी लालरिनुंगा
जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंगच्या पुरूष 67 किलो गटात 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. रौप्यपदक विजेत्या वायपावा लोन (293 किलो) पेक्षा सात किलो जास्त वजन उचलून तो चॅम्पियन बनला.
6) अचिंता शेउली
अचिंता शेउलीनं पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात स्नॅच फेरीत 143 किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीत 170 किलो वजन उचललं. अशाप्रकारे त्यानं एकूण 313 किलो वजन उचललं आणि भारताच्या खात्यात तिसरं सुवर्णपदक जमा केलं.
राष्ट्रकुल स्पर्धेचा चौथा दिवस-
7) सुशीला देवी
सुशीला देवी लिकमाबमनं ज्युदोच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत सुशीलाचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हिटबोईशी झाला, ज्यात सुशीला देवीनं विजय मिळवला.
8) विजय कुमार यादव
ज्युदोमध्ये विजय कुमार यादवनं भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 60 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआकडून त्याला पराभव पत्करावा लागला. यानंतर त्याला रेपेचेज सामन्यांमध्ये संधी मिळाली आणि येथे त्यानं कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत विजयनं सायप्रसच्या प्राटोचा 10-0 असा पराभव केला.
9) हरजिंदर कौर
भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या 71 किलो वजनी गटात एकूण 212 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. हरजिंदरनं स्नॅचमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो वजन उचललं.
हे देखील वाचा-
- CWG 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर, इंग्लंड दुसऱ्या स्थानावर; भारताचा क्रमांक कितवा?
- CWG 2022 Day 5 Schedule: बॅडमिंटन, टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडू आज सुवर्णपदकासाठी लढणार; कसं असेल आजचं संपूर्ण वेळापत्रक?
- CWG 2022 : भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू सौरव घोषाल उपांत्य फेरीत; सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर