WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
WTC Final Qualification : डार्विनच्या मरारा क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाचा तब्बल 9 विकेट्सनी पराभव केला.

WTC Points Table 2025-27 : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या एका निकालानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27च्या गुणतालिकेचं समीकरणच बदललं आहे. डार्विनच्या मरारा क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाचा तब्बल 9 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपला पहिलाच कसोटी विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेड-बॉल क्रिकेटमधील हा त्यांचा एकूण दुसरा विजय ठरला.
पहिल्या डावात तब्बल 228 धावांची आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 284 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे विजयासाठी केवळ 57 धावांचं लक्ष्य मिळालं. बांगलादेशनं हे लक्ष्य अवघ्या 14.2 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं.
WTC गुणतालिकेत बांगलादेशचा मोठा फायदा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दणदणीत विजयाचा थेट परिणाम WTC 2025-27च्या गुणतालिकेवर झाला आहे. विजयामुळे बांगलादेशच्या खात्यात महत्त्वाचे गुण जमा झाले असून त्यांचा पॉइंट्स पर्सेंटेज अर्थात PCT 58.33 वरून थेट 66.67 टक्क्यांवर पोहोचला आहे.
या जबरदस्त सुधारणाीनंतरही बांगलादेश गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. मात्र, त्यांनी अव्वल संघांवरील दबाव प्रचंड वाढवला आहे. याआधी पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात नमवत बांगलादेशनं WTCच्या शर्यतीत आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.
ऑस्ट्रेलिया अजूनही अव्वल, पण मोठा धक्का
बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचं पहिलं स्थान कायम आहे. मात्र, या पराभवाचा त्यांच्या पॉइंट्स पर्सेंटेजवर मोठा परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा पॉइंट्स पर्सेंटेज 87.50 टक्क्यांवरून घसरून 77.77 टक्क्यांवर आला आहे. WTCच्या या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा 9 सामन्यांमधील दुसरा पराभव आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पराभवांचा सामना ऑस्ट्रेलियाला मायदेशातच करावा लागला आहे. त्यामुळे बांगलादेशचा विजय केवळ एका कसोटी सामन्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर WTCच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत त्याचे मोठे परिणाम दिसू शकतात.
टीम इंडिया पाचव्या स्थानावर
दरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी मात्र या निकालानंतर परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. टीम इंडिया सध्या 48.15 टक्के पॉइंट्स पर्सेंटेजसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी सुरू असताना या सामन्याच्या निकालाकडेही आता WTCच्या दृष्टीनं मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं जात आहे. भारतानं हा सामना जिंकला, तरी टीम इंडियाच्या रँकिंगमध्ये तात्काळ बदल होणार नाही. मात्र, भारताचा पॉइंट्स पर्सेंटेज 48.15 वरून 53.33 टक्क्यांवर जाईल.
श्रीलंका जिंकल्यास भारताला मोठा धक्का
गॉल कसोटीत श्रीलंकेनं भारताचा पराभव केला, तर समीकरण पूर्णपणे बदलेल. श्रीलंकेचा पॉइंट्स पर्सेंटेज 53.33 टक्क्यांवर पोहोचेल आणि ते भारताला मागे टाकून पाचव्या स्थानावर जातील. त्याचवेळी टीम इंडियाचा पॉइंट्स पर्सेंटेज 43.33 टक्क्यांवर घसरेल आणि भारताची सहाव्या स्थानावर घसरण होईल. त्यामुळे गॉल कसोटी भारतासाठी केवळ मालिका जिंकण्याच्या दृष्टीनं नव्हे, तर WTCच्या गुणतालिकेतील स्थान वाचवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सामना ड्रॉ झाल्यास काय होईल?
भारत-श्रीलंका पहिली कसोटी अनिर्णित राहिली तरी दोन्ही संघांच्या PCTमध्ये बदल होईल. ड्रॉ झाल्यास भारताचा पॉइंट्स पर्सेंटेज 46.66 टक्क्यांवर, तर श्रीलंकेचा पॉइंट्स पर्सेंटेज 40.00 टक्क्यांवर येईल. मात्र या परिस्थितीत गुणतालिकेतील त्यांच्या स्थानांमध्ये बदल होणार नाही. म्हणजेच भारत पाचव्या आणि श्रीलंका त्याखालीच राहील. बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयामुळे WTC 2025-27ची शर्यत आणखी रोमांचक झाली आहे. एका बाजूला ऑस्ट्रेलिया अजूनही अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेश सातत्याने आपली स्थिती मजबूत करत आहे. दुसरीकडे भारताला प्रत्येक सामन्यात गुण मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे.
हे ही वाचा -




















