SA vs AUS WTC Final : दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट गमावून 213 धावा केल्या आहेत.

South Africa vs Australia World Test Championship : 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट गमावून 213 धावा केल्या आहेत. आफ्रिकन संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आला आहे, आता त्यांना ट्रॉफी उंचावण्यासाठी फक्त 69 धावा करायच्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत एडेन मार्करामने 102 धावा केल्या आहेत, तर टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असूनही 65 धावांवर नाबाद आहे. पहिल्या दोन दिवसांत गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले असले तरी, तिसऱ्या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले.
Aiden Markram and Temba Bavuma guide South Africa to the brink of #WTC25 glory 🙌
— ICC (@ICC) June 13, 2025
Look how the day unfolded 👉 https://t.co/pQ7yVByD1d pic.twitter.com/kHI8s8GDg7
तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला डाव 144/8 च्या धावसंख्येवरून पुढे नेला होता. मिशेल स्टार्कने जोश हेझलवूडसह 10 व्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. स्टार्कच्या 58 धावांच्या नाबाद खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 207 धावा केल्या आणि चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचे लक्ष्य दिले.
दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर
जेव्हा दक्षिण आफ्रिका 282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, तेव्हा त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. रायन रिकेल्टन फक्त 6 धावा करून बाद झाला. एडेन मार्कराम आणि वियान मुल्डर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली, परंतु त्यानंतर 27 धावा करून मुल्डर आऊट झाला. संघाची दुसरी विकेट पडली तेव्हा दक्षिण आफ्रिकेला अजूनही 212 धावांची आवश्यकता होती.
एडेन मार्करामचे शतक, बावुमाचे धाडस
वियान मुल्डर आऊट झाल्यानंतर एडेन मार्कराम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी जबाबदारी घेतली. सुरुवातीला त्यांनी सावकाश फलंदाजी केली आणि नंतर धावफलक वेगाने पुढे सरकवला. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, तिसऱ्या विकेटसाठी त्यांची भागीदारी 143 धावांवर पोहोचली आहे. मार्करामने 102 धावा केल्या आहेत, तर बावुमा 65 धावा करून नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज फॉर्ममध्ये नव्हते, विशेषतः मिचेल स्टार्क खूप महागडा ठरला, त्याने सुमारे 6 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. पण, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही विकेटही घेतल्या. जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांनाही एकही विकेट घेता आली नाही.
हे ही वाचा -




















