(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB vs GG : सोफी डिव्हाईनच्या धडाकेबाज 99 धावा, आरसीबीचा गुजरातवर 8 गडी राखून दणदणीत विजय
WPL 2023 : रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने महिला प्रीमियर लीगमध्ये आता आपला खेळ दाखवण्यास सुरुवात केली असून सुरुवातीला 5 सामने गमावल्यानंतर बंगळुरूने आता सलग दोन सामने जिंकले आहेत.
RCB-W vs GG-W, WPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स (RCB vs GG) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 16 वा सामना (WPL) रंगला. या सामन्यात आरसीबीने गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला. हा सामना बंगळुरूसाठी करो या मरो असा होता. कारण सुरुवातीचे सामने गमावल्यामुळे त्यांना ही लढत जिंकणं अनिवार्य होतं. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी दमदार क्रिकेट खेळत 8 विकेट्सने विडय मिळवला. बंगळुरूची सलामीवीर सोफी डिव्हाईनने 36 चेंडूत 99 धावांची खेळी करत सामना एकतर्फी केला. सोफी डेव्हाईनने या खेळीत 8 षटकार आणि 9 चौकार लगावले. सोफी डिव्हाईनच्या या खेळीमुळे बंगळुरूने अवघ्या 15.3 षटकांत 189 धावा करून सामना 8 विकेट्सने जिंकला.
या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून दक्षिण आफ्रिकेची खेळाडू लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. त्याने 42 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या ऍशले गार्डनरने 26 चेंडूत 41 धावांची खेळी करत लॉराला साथ दिली. या खेळीत गार्डनरने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय गुजरातच्या सभिनेनी मेघनानेही 32 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली, ज्यात तिने 4 चौकार मारले.
गुजरातच्या डावाला बंगळुरूचे चोख प्रत्युत्तर
बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने सात गोलंदाजांचा वापर केला मात्र तिला फारसे यश मिळाले नाही. बंगळुरूकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक विकेट घेतल्या. श्रेयंकाने 2 षटकात 17 धावा देत 2 बळी घेतले. त्यांच्याशिवाय सोफी डिव्हाईन आणि प्रीती बोस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, या सामन्यात आरसीबीने गुजरातला त्यांच्या फलंदाजीने चोख प्रत्युत्तर दिले. तिने पॉवरप्लेच्या 6 षटकात एकही विकेट न गमावता 77 धावा केल्या, जी महिला प्रीमियर लीगमधील आतापर्यंतची सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या आहे. आरसीबीचा डाव इथेच थांबला नाही. मग सोफी डिव्हाईन नावाचे एक अनोखे वादळ मैदानात आले. एका वेळी असे वाटत होते की ती महिला आयपीएलचे पहिले शतक आणि जागतिक महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक करू शकते, परंतु 99 धावांवर ती बाद झाली, तिचं शतक हुकलं असलं तरी सामना आरसीबीने जिंकला.
गुजरातशी लढत युपीशी
आता आगामी WPL सामना हा उद्या (20 मार्च) होणार असून हंगामातील हा 17 वा सामना खेळवला जाईल. हा सामना युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स (UP vs GG) या संघांमध्ये होणार आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला मात दिल्यामुळे यूपी संघाची चर्चा होत असून आता ते गुजरातविरुद्ध मैदानात उतरेल. यूपी संघाने सहापैकी तीन सामन्यात विजय मिळवला असून तीन सामने गमावले आहेत. तर गुजरातने सात पैकी केवळ दोन सामना जिंकले असून 5 सामने गमावले आहेत.
हे देखील वाचा-