MI-W vs UPW-W, Playoff: मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात होणार प्लेऑफ सामना, 'या' खेळाडूंवर असतील साऱ्यांच्या नजरा
MI-W vs UPW-W: महिला प्रीमियर लीग 2023 चा प्लेऑफ सामना 24 मार्च रोजी खेळवला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये होणार आहे. सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
MI-W vs UPW-W, Playoff : महिला प्रीमियर लीग 2023 चा (WPL 2023) पहिला सीझन आता संपत आला आहे. लीगचा प्लेऑफ सामना म्हणजेच एलिमिनेटर सामना 24 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्सच्या (MI vs UPW) महिला संघांमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. हा प्लेऑफ सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. चांगल्या नेट रनरेटच्या आधारे दिल्लीचा संघ आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. प्लेऑफ सामन्यात मुंबई आणि यूपी यांच्यात निकराची लढत होणार आहे. दोन्ही संघात असे अनेक खेळाडू आहेत जे सामन्याचा निकाल लावू शकतात. यातील काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊ...
या खेळाडूंवर मुंबईची भिस्त
मुंबईचा संघ यूपी वॉरियर्सविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात प्रवेश करेल तेव्हा अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर असेल. हरमनप्रीत कौरच्या संघाने महिला प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. एकेकाळी मुंबई इंडियन्सचा संघ पॉइंट टेबलवर पहिल्या क्रमांकावर होता. पण नेट रनरेटमुळे ते दिल्लीपेक्षा मागे पडले. मुंबई संघात असे अनेक खेळाडू आहेत जे या सामन्यात यूपी वॉरियर्सला मात देऊ शकतात. संघासाठी सर्वाधिक धावा करण्यात हेली मॅथ्यूज आणि हरमनप्रीत कौर आघाडीवर आहेत, मॅथ्यूजने 8 सामन्यात 232 धावा केल्या आहेत. नाबाद 77 ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती. दुसरीकडे, हरमनप्रीत कौरने 7 डावात 230 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 3 अर्धशतकं झळकावली. तिची सर्वोत्तम धावसंख्या 65 धावा आहे.
दुसरीकडे, जर आपण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांबद्दल बोललो, तर सायका इशाक आणि अमेलिया केर यूपी वॉरियर्सला अडचणीत आणू शकतात. दोन्ही खेळाडूंनी महिला प्रीमियर लीगमध्ये 13-13 विकेट घेतल्या आहेत. लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत सायका आणि अमेलिया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. महिला IPL 2023 मध्ये सायकाची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 11 धावांत 4 विकेट्स. त्याचवेळी, अमेलिया केरची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 22 धावांत 3 बळी घेणं ही आहे.
यूपीच्या या खेळाडूंचे पारडे जड
युपी वॉरियर्सची ताहलिया मॅकग्रा महिला आयपीएल 2023 मध्ये बॅटने चमकत आहे. या स्पर्धेत एकूण सर्वाधिक धावा करणारी ती दुसरी फलंदाज ठरली आहे. तिने 8 सामन्यात 295 धावा केल्या आहेत. तिने या स्पर्धेत आतापर्यंत 4 अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान तिची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 90 होती. तिच्याशिवाय अॅलिसा हिलीच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली आहे. तिने यूपी वॉरियर्ससाठी 8 सामन्यात 242 धावा केल्या आहेत. एलिसाने या स्पर्धेत आतापर्यंत 2 अर्धशतकं झळकावली आहेत. हे दोन्ही खेळाडू मुंबईविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
याशिवाय यूपी वॉरियर्सच्या ताहलिया मॅकग्राने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तिने महिला आयपीएलमध्ये सर्वाधिक 14 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, 13 धावांत 4 बळी मिळवणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. मुंबईविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात ती निर्णायक ठरू शकते. त्याच्याशिवाय दीप्ती शर्मानेही लीगमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. दीप्तीने महिला प्रीमियर लीगमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. एलिमिनेटर सामन्यात चांगली गोलंदाजी करून तिला आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन जायचे आहे.
हे देखील वाचा-