Ind vs Aus T20 : टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर टीकेची झोड, गौतम गंभीरवर संतापला दिग्गज खेळाडू; जाणून घ्या नेमकं कारण काय?
IND vs AUS T20 Series 2025 : भारताचा माजी दिग्गज खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अर्शदीप सिंगला बाकावर बसवल्याबद्दल टीम व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे.

IND vs AUS T20 Series 2025 : भारताचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अर्शदीप सिंगला बाकावर बसवल्याबद्दल टीम व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप याला पुन्हा दुर्लक्षित करून हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात भारताचा डाव 125 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने केवळ 13.2 षटकांत लक्ष्य गाठत 4 गडी राखून सहज विजय मिळवला.
टी20 मालिकेत एका अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्याच्या निर्णयामुळे अर्शदीपला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळत नाही, आणि हर्षित राणा वारंवार संघात दिसत आहे. यावर आर. अश्विनने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जसप्रीत बुमराहसोबत अर्शदीप असायलाच हवा.
अश्विनच्या ‘ऐश की बात’ या यूट्यूब शोमध्ये पत्रकाराने विचारले की, “मेलबर्नमध्ये अर्शदीपला बाहेर ठेवणे किती योग्य आहे?” यावर अश्विन म्हणाला की, “या प्रश्नाचं उत्तर देऊन मी थकलो आहे. जेव्हा तुम्ही अर्शदीपबद्दल बोलता, तेव्हा प्रश्न येतो की तो कोणाच्या जागी खेळू शकतो. तो फक्त हर्षित राणाच्या जागी येऊ शकतो. पण खरी समस्या ही आहे की आपण अतिरिक्त फिरकी गोलंदाजासह खेळलो का? ज्या पिचवर उसळी आणि वेग दिसत होता, तिथे एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायला हवा होता.”
अश्विन पुढे म्हणाला की, “माझा मुद्दा इतकाच आहे की जसप्रीत बुमराह खेळत असेल, तर अर्शदीप हा दुसरा मुख्य वेगवान गोलंदाज असायला हवा. मला अजिबात समजत नाही की अर्शदीप प्लेइंग 11 च्या बाहेर कसा राहतो आहे. हे खरोखरच गोंधळात टाकणारं आहे.”
अश्विनने स्पष्ट केलं की ही, टीका हर्षित राणावर नाही, तर फक्त अर्शदीपसाठी आहे. “हर्षित राणाने आज फलंदाजीत चांगले योगदान दिले, पण ही चर्चा त्याच्याबद्दल नाही, ही अर्शदीपबद्दल आहे. टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती, पण त्यानंतर त्याला सतत बाहेर बसवण्यात आलं. त्यामुळे त्याची लय बिघडली,” असं तो म्हणाला.
अश्विनने शेवटी म्हटलं की, “आपण आशिया कपमध्ये पाहिलं की अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याला सातत्याने खेळवले नाही तर कोणताही चॅम्पियन गोलंदाज आपला फॉर्म गमावतो. सध्या अर्शदीप कठीण परिस्थितीत आहे आणि मला वाटतं की त्याला त्याचा योग्य हक्क, संघात नियमित स्थान लवकरच मिळायला हवं. कृपया त्याला संधी द्या.”
हे ही वाचा -





















