(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL: 'आम्ही नशीबवान होतो की...', पहिल्या टी-20 मध्ये भारताने श्रीलंकेचा कसा पराभव केला?, सूर्यकुमार यादवने सांगितलं रहस्य!
Ind vs SL Suryakumar Yadav Reaction: टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 213 धावा केल्या.
Ind vs SL Suryakumar Yadav Reaction: विश्व चॅम्पियन भारतीय संघाने पहिल्या टी-20 सामन्यात शनिवारी यजमान श्रीलंका संघावर 43 धावांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यासह सूर्यकुमार यादव-गौतम गंभीर युगाचा विजयी आरंभ करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंका सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या झटपट विकेट्स घेतल्या. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यातील विजयामागील रहस्य सांगितलं आहे.
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 170 धावांवर आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करताना, एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या 1 विकेट्स गमावत 140 अशी होती. यानंतर सामना भारताच्या बाजूने फिरला. सामना संपल्यानंतर, आम्ही नशीबवान आहोत की दव आले नाही, असं कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला. सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, तो पहिल्याच चेंडूपासून शानदार क्रिकेट खेळत होता. तो लय राखत होता, याचे श्रेय त्याला जाते. रात्री विकेट कशी फिरते हे आम्हाला माहीत आहे. आम्ही भाग्यवान होतो की मैदानावर दव आला नाही. आम्ही विश्वचषकमध्ये ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे आम्हाला आठवण झाली की सामना अजून संपलेला नाही. डाव्या हाताच्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाबाबत संघासाठी जे योग्य असेल ते आम्ही करू, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
🎥 Showcasing some of #TeamIndia's stars from first T20I 🙌#SLvIND | @surya_14kumar | @akshar2026 | @ParagRiyan pic.twitter.com/LRG1ZiIiQa
— BCCI (@BCCI) July 28, 2024
भारतीय फलंदाजांची तुफान फटकेबाजी-
टीम इंडियानं टॉस गमावला, त्यानंतर श्रीलंकेनं सर्वात आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून सर्वात आधी फलंदाजी करताना सात गडी गमावून 213 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवनं 26 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 58 धावा केल्या. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं 33 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीनं 49 धावा केल्या. उपकर्णधार शुभमन गिलनं 16 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारांसह 34 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालनं 21 चेंडूत 41 धावांची खेळी केली. यशस्वीनं पाच चौकार आणि दोन षटकार मारले. श्रीलंकेसाठी मथिशा पाथिरानानं सर्वाधिक चार विकेट घेतल्या.