कोलंबोत विराट कोहलीच किंग, मागील 3 डावात शतके, आजही मोठ्या खेळीची अपेक्षा
Virat Kohli In Colombo : कोलंबोमध्ये आज राखीव दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे.
Virat Kohli In Colombo : कोलंबोमध्ये आज राखीव दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला होता. काल, जिथे सामना थांबला तेथूनच आज पुन्हा सुरु होणार आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन बाद 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर होते. आज विराट कोहली आणि राहुल डावाची सुरुवात करतील. विराट कोहलीकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा सर्वांनाच आहे. विराट कोहलीसाठी कोलंबोचं मैदान लाभदायी आहे. या मैदानवर विराट कोहलीने 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा चोपल्या आहेत. आजही विराट कोहलीकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा असेल. मागील तीन डावात विराट कोहलीने या मैदानावर शतके झळकावली आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोच्या मैदानावर सामना होत आहे. विराट कोहलीने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर मागील तीन डावात तीन शतके ठोकली आहेत. आज पुन्हा एकदा किंग कोहलीकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा असेल. कोलंबोच्या मैदानावर विराट कोहलीने मागील तीन डावात 128*, 131 आणि 111 धावा चोपल्या आहेत. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
रविवारी नाबाद राहिला किंग कोहली -
पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला होती. पण रोहित शर्मा आणि गिल यांनी बाबरच्या निर्णायावर पाणी फेरले. दोघांनी आक्रमक सुरुवात केली. गिल आणि रोहित यांनी शतकी सलामी देत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शाहीन आफ्रिदी आणि शादाब यांनी भारताच्या सलामी जोडीला तंबूत धाडले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सांभाळला. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे सामना थांबवावा लागला होता. सामना तांबला तेव्हा विराट कोहली आठ तर राहुल 17 धावांवर नाबाद होते. आज दोघेही तेथूनच खेळाला सुरुवात करतील. विराट कोहलीकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा असेल. विराट कोहलीने आज शतकी खेळी केली तर अनेक विक्रमांना गवसणी घालेल. विराट कोहलीचे हे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील 77 वे आणि वनेडीतील 47 वे शतक असेल.
13,000 हजार धावा पूर्ण करणार...
विराट कोहलीने आज शतकी खेळी केली तर वनडे क्रिकेटमध्ये 136 हजार धावांचा टप्पा पार करेल. विराट कोहलीच्या नावावर सध्या 1290 धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा पराक्रमही विराट कोहलीच्या नावावर होणार आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने केला आहे.
विराट कोहलीचे वनडे करिअर
रनमशीन विराट कोहलीने आतापर्यंत 278 वनडेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. विराट कोहलीने 267 डावात 57.2 च्या सरासरीने आतापर्यंत 12910 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 46 शतके आणि 65 अर्धशतके ठोकली आहेत.