(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaibhav Suryavanshi : IPL मध्ये तब्बल एक कोटींची बोली लागली, पण पाकिस्तानविरुद्ध अवघ्या एका धावेवर बाद झाला; वैभव सूर्यवंशी ठरला अपयशी
टीम इंडियाने अंडर-19 आशिया कप मोहिमेची सुरुवात शनिवारी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून केली.
India vs Pakistan U-19 Asia Cup 2024 : टीम इंडियाने अंडर-19 आशिया कप मोहिमेची सुरुवात शनिवारी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून केली. मोहम्मद अमानच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यावेळी नवव्या अंडर-19 आशिया कप विजेतेपदाचा शोध घेत आहे. पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 50 षटकांत सात गडी गमावून 281 धावा केल्या.
पाकिस्तानने भारतीय संघाला 282 धावांचे लक्ष्य दिले पण संघाची सुरूवात खुपच खराब झाली. दोन्ही सलामीवीर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी हे स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. आधी सलामीवीर आयुष म्हात्रेने विकेट गमावली. तो 20 धावांवर झेलबाद झाला. तर आयपीएल लिलाव 2025 मध्ये 1.10 कोटी रुपयांना विकला गेलेला सर्वात तरुण वैभव सूर्यवंशी केवळ 1 धावा काढून बाद झाला.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील पहिला सामना आहे. दोघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. या दोन संघांशिवाय या गटात यूएई आणि जपान आहेत. भारतीय संघ हा अंडर-19 आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. गेल्या 10 पैकी आठ वेळा त्याने विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तानने एकदा भारतासोबत ट्रॉफी शेअर केली होती. या सामन्यात सर्वांच्या नजरा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर होत्या, जो नुकताच आयपीएल मेगा लिलावात 1.1 कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला होता. पण तो केवळ 1 धावा काढून बाद झाला.
वैभवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले होते शतक
30 लाख रुपयांची मूळ किंमत असलेला वैभव हा आयपीएल लिलावात निवड झालेला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2025 हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने वैभव सूर्यवंशीचा 1.10 कोटींची बोली लावून संघात समाविष्ट केला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर-19 कसोटीतही शतक झळकावले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने चेन्नईत ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाविरुद्ध 62 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. या खेळीनंतर युवा क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्यावेळी त्यांचे वय 13 वर्षे 187 दिवस होते.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केला मोठा विक्रम
त्याच्या आधी हा विक्रम बांगलादेशचा विद्यमान कर्णधार नजमुल हुसैन शांतोच्या नावावर होता, ज्याने वयाच्या 14 वर्षे 241 दिवसात ही कामगिरी केली होती. यापूर्वी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राजस्थान विरुद्ध बिहारकडून खेळणार वैभव सर्वात तरुण खेळाडू ठरला. याशिवाय त्याने या वयात रणजी सामनेही खेळले आहेत, हा एक विक्रम आहे.
सर्वात कमी वयात रणजी खेळण्याच्या बाबतीत वैभवने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगला मागे टाकले आहे. सचिनने वयाच्या 15 वर्षे 230 दिवसांचा पहिला रणजी सामना खेळला, तर युवराजने कारकिर्दीतील पहिला रणजी सामना खेळला तेव्हा तो 15 वर्षे 57 दिवसांचा होता.