(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India A vs New Zealand A : भारताचा न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय, संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखाली 'अ' संघाची कमाल
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्या 'अ' संघामध्ये सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात असून सलामीचा सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
India A vs New Zealand A : एकिकडे भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) टी20 मालिका खेळत असून दुसरीकडे भारताचा 'अ' संघ न्यूझीलंडच्या 'अ' संघाशी एकदिवसीय सामने खेळत आहे. या सामन्यांसाठी संजू सॅमसनकडे संघाचं नेतृत्त्व देण्यात आलं आहे. दरम्यान आज (22 सप्टेंबर) पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 7 विकेट्सनी मात देत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आधी फलंदाजी करत न्यूझीलंडने 167 धावा केल्या. हे लक्ष्य भारताने केवळ 3 गडी गमावत 31.5 षटकात पूर्ण केलं.
सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल कामगिरी करत अवघ्या 167 धावांमध्ये न्यूझीलंडला रोखलं. यावेळी न्यूझीलंडचे सुरुवातीपासून गडी बाद होते. केवळ अष्टपैलू रिपॉनने 61 धावांची एकहाती झुंज दिली. त्याउलट भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वात उत्तम गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतले. तसंच कुलदीप सेननं 3 आणि कुलदीप यादवनं एक विकेट घेतली.
7 गडी राखून भारत विजयी
168 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ 17 धावा करुन बाद झाला. ऋतुराजने 41 तर राहुल त्रिपाठीने 31 धावांची चांगली खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यावर कर्णधार संजू सॅमसन आणि आयपीएल गाजवणाऱ्या रजत पाटीदारने डाव सावरत सामना भारताला जिंकवून दिला. यावेळी संजूने नाबाद 29 तर रजतने नाबाद 45 धावांची खेळी केली. भारताने 31.5 षटकात 3 गडी गमावत 170 धावा करत सामना सात विकेट्सनी जिंकला.
उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक?
दिवस | तारीख | सामना | ठिकाण |
रविवार | 25 सप्टेंबर | पहिला एकदिवसीय सामना | एम.ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई |
मंगळवार | 27 सप्टेंबर | पहिला एकदिवसीय सामना | एम.ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई |
कसा आहे संघ -
पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईस्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उम्रान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा
हे देखील वाचा-