Smriti Mandhana : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वन-डेमध्ये स्मृती मंधानाच्या नावावर मोठा रेकॉर्ड, दिमाखात ओलांडला 3000 धावांचा टप्पा
IND vs ENG, 2nd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघामध्ये पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत भारत 88 धावांनी जिंकला असून याचवेळी 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या स्मृतीने नवा रेकॉर्ड केला आहे.
Smriti Mandhana ODI Record : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs ENG) भारताची स्टार सलामीवीर स्मृती मांधना (Smriti Mandhana) हिने एक खास रेकॉर्ड नावावर केला आहे. स्मृतीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सर्वाधिक वेगाने 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी भारताकडून शिखर धवन आणि विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमध्ये ही अत्यंत वेगाने 3000 धावा पूर्ण केल्या आहेत.
शिखर धवनने 72 एकदिवसीय डावात 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर विराट कोहलीनं 75 एकदिवसीय डावात ही कमाल केली आहे. मंधानाने कोहलीपेक्षा केवळ एक डाव अधिक खेळत म्हणजेच 76 डावात ही कामगिरी केली आहे. यामुळे स्मृती भारतीय महिलांमध्ये सर्वात वेगाने 3000 धावा पूर्ण करणारी खेळाडू बनली आहे. डावखुरी सलामीवीर स्मृतीने 2013 मध्ये एकदिवसीय क्रिकेमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तिने 5 शतकं आणि 24 अर्धशतकं ठोकली आहे. मिताली राज आणि हरमनप्रीत कौरनंतर वन-डेमध्ये 3000 धावा करणारी ती तिसरी भारतीय क्रिकेटर आहे. तिच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3023 धावा आहेत.
भारत 88 धावांनी विजयी
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पण फलंदाजीला आलेल्या भारतीय महिलांनी इंग्लंडचा हा निर्णय़ चूकीचा ठरवत अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवलं. शेफाली 8 धावा करुन बाद झाली असली तरी स्मृती मंधानाने 40 धावांची महत्तपूर्ण खेळी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली नाबाद 143 धावांची खेळी यादगार ठरली. हरलीन देवोलनेही 58 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी केली. या तिघींच्या खेळीच्या जोरावर भारताने 334 धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले. मैदानात 334 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खास झाली नाही. सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. अॅलिस कॅपिसी आणि डॅनियल वॅटने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अॅलिस 39 धावा करुन बाद झाली. अॅमि जोन्सने 39 धावांची साथ डॅनियलला दिली. चॅरलोट डीननेही 37 धावा केल्या. पण या सर्वजणी बाद झाल्या, डॅनियलनेही 65 धावांची एकहाती झुंज दिली, पण अखेर भारताच्या दमदार गोलंदाजीसमोर तिचाही निभाव लागला नाही आणि 245 धावांच इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना भारताने 88 धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या :