Kane Williamson : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवून देणाऱ्या केनची जागा टॉम लेथम घेणार? न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधार बदलण्याची शक्यता
ENG vs NZ : न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून कर्णधार केन विल्यमसन सध्या कोरोनाबाधित असल्यामुळे संघाबाहेर आहे.
Kane Williamson : न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार म्हणून केन विल्यमसनला (Kane Williamson) ओळखलं जातं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेसारखी सर्वात मानाची थोडक्यात कसोटी क्रिकेटचा विश्वचषक असणारी स्पर्धा केनने संघाला जिंकवून दिली आहे. ज्यानंतर आता केवळ वर्षभरात केनच्या जागी कसोटी कर्णधार म्हणून टॉम लेथमला निवडलं जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटर सायमन डोल यांनीही हा सल्ला दिला आहे.
सध्या न्यूझीलंड आणि इंग्लंड़ यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पण दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच केनला कोरोनाची बाधा झाल्याने तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी याबद्दल माहिती दिली होती. दरम्यान याआधीही केन दुखापतीमुळे बराच काळ विश्रांतीवर होता. या सगळ्यामुळे आता केनच्या जागी दुसरा कर्णधार कसोटी संघासाठी निवडण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात आता केनच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध टॉम लेथम कर्णधार असल्याने त्याला पूर्णवेळ कसोटी संघाचा कर्णधार केलं जाऊ शकतं.
न्यूझीलंडचा संघ 0-1 नं पिछाडीवर
न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. लॉर्ड्स कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर न्यूझीलंडचा संघ 0-1 नं पिछाडीवर आहे. त्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 10 जूनपासून सुरु झाला आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिके बरोबरी करण्याच्या प्रयत्नात न्यूझीलंडचा संघ असेल. तर इंग्लंड विजय मिळवून विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
हे देखील वाचा-