पुढचे यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह कर्जत-नगरमधूनच येणार; राशीनमध्ये रोहित शर्माच्या हस्ते भव्य मैदानाचं उद्घाटन
Rohit Sharma-Rohit Pawar: सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण आणि खेळाडू राशीन येथे हजर होते.
Rohit Sharma: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकाराने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या हस्ते कुदळ मारून राशीन येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भूमिपूजन करण्यात आलं आहे. रोहित शर्मा येथे क्रिकेट अकॅडमी सुरू करत आहेत. ग्रामीण भागतील रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडमी आहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे.
सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण आणि खेळाडू राशीन येथे हजर होते. रोहित शर्माने यावेळी उपस्थित असणाऱ्यांसोबत मराठी संवाद साधला. कसं काय कर्जत-जामखेडकरांनो...असं रोहित शर्माने विचारलं. यापुढे रोहित शर्माने मराठीतूनच भाषण केलं. मागच्या तीन-चार वर्षांसोबत झालं. आम्ही टी-20 विश्वचषक जिंकलो. आमचं विश्वचषक जिंकणं हे खूप महत्वाचं होतं. विश्वचषक जिंकल्यानंतर आमच्या जिवात जीव आला, असं विधान रोहित शर्माने केलं.
पुढचा यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह येथूनच होणार-
पुढचा यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह कर्जत-जामखेडमधूनच होणार असं मोठं विधानही रोहित शर्माने केलं. तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं, त्यासाठी धन्यवाद...मी पुन्हा या ठिकाणी येईल, असंही रोहित शर्मा म्हणाला. रोहित पवार यांनी रोहित शर्माला कर्जत-जामखेड येथे येऊन कसं वाटलं?, असा प्रश्न विचारला. यावेळी इकडे येऊन पवित्र वाटलं, असं उत्तर रोहित शर्माने दिलं.
रोहित शर्माच्या कृतीनं जिंकली मने-
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पार्श्भूमीवर कर्जत तालुक्यातील राशीन येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असल्याने तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. रोहित शर्मा हा व्यासपिठावर आल्यावर सुरवातीला व्यासपीठावरील ठेवलेल्या सर्व पूजनीय असलेल्या महान व्यक्तींचे फोटो लावले होते त्याला नमस्कार करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सांगितल्यावर क्रिकेटपटू रोहित शर्मा याने तत्काळ आपले पायातील बूट काढून सर्व महामानवांच्या फोटोला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले त्यांच्या या कृतीने रोहित शर्मा यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
कर्जत शहरातही स्टेडियम होणार-
कर्जत शहरात पण स्टेडियम होत आहेत, येथे रणजी सामने होतील असा आमचा मानस असल्याचं रोहित पवार यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे पण ग्राउंड उभा करत आहोत. सीएसआर फंडातून हे सगळं उभा करण्यात येणार आहे. येथील अकॅडमीत होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. क्रिकेट, कुस्ती आणि उरेलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ आणि अहमदनगर जिल्ह्यातील मुलांना याचा फायदा होईल, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे, तर कर्जत जामखेड स्टेडियमला तेथील लोकांना विचारून नाव देण्याचं ठरविण्यात येईल, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातमी:
माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडला होता क्रिकेटपटू जडेजा; लग्नाचीही तयारी झाली, पण एक घटना अन् The End