(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वेगवान अर्धशतक मिशेल मार्शच्या नावावर, जाणून घ्या टॉप 5 खेळाडू
T20 WC 2021 : टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शच्या नावावर झाला आहे.
T20 WC 2021 Final : टी 20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. या विजयाचा शिल्पकार ठरलेला मिशेल मार्शने 77 धावांची खेळी केली. या मिशेल मार्शच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. मिशेल मार्स हा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे.
मिशेल मार्शने आजच्या सामन्यात न्यूझीलंडविरोधात आक्रमक खेळी करताना केवळ 31 चेंडूत अर्धशतक केलं. हे आतापर्यंतच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील सर्वाधिक वेगवान ठरलं आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार के विल्यमसन याचा नंबर लागतो. विल्यमसन याने आजच्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात केवळ 32 चेंडूत अर्धशतक केलं आहे. पण दुर्दैवाने त्याची ही खेळी संघाच्या विजयासाठी उपयोगी पडू शकली नाही.
टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वेगवान अर्धशतकाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेच्या संगकाराचे नाव आहे. त्याने 2014 सालच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात केवळ 33 चेंडूमध्ये अर्धशतक केलं होतं. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा ज्यो रुट असून त्याने 2016 सालच्या टी 20 वर्ल्ड कप अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात 33 चेंडूमध्ये अर्धशतक केलं होतं. पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर असून त्याने आजच्या सामन्यात न्यूझीलंडविरोधात 34 चेंडूत अर्धशतक केलं आहे.
विशेष म्हणजे अंतिम सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या टॉप 5 बॅट्समनच्या यादीत भारताचा एकही खेळाडू नाही.
ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपवर नाव
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप मधील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 8 विकेट्सनं मात करीत विश्वचषक आपल्या नावावर केलाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18.5 षटकातच पूर्ण करून यंदाच्या विश्वचषकाचा खिताब जिंकलाय.