कुलदीप यादवला संघात स्थान मिळाल्यास कोण बाहेर जाणार? टीम इंडिया सुपर 8 साठी नवी रणनीती राबवणार
Team India : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्मानं ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये संघात कोणताही बदल केलेला नाही.
बारबाडोस : टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2024 ) ग्रुप स्टेजमधील मॅचेस संपल्या आहेत. वेस्ट इंडिजनं अखेरच्या लीग मॅचमध्ये अफगाणिस्तानला पराभूत केलं. दुसरीकडे भारतानं (Team India) अ गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताशिवाय सुपर 8 मध्ये अमेरिकेनं प्रवेश केला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वातील टीम इंडियानं अमेरिका, आयरलँड आणि पाकिस्तानला पराभूत करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला. रोहित शर्मानं पहिल्या तीन टी 20 मॅचमध्ये संघात कोणताही बदल केला नव्हता. रोहितनं चार वेगवान गोलंदाज आणि दोन स्पिनर्सना संघात स्थान दिलं होतं. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग यांनी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. तर, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी फिरकी गोलंदाजीची बाजू सांभाळली.
आता भारतीय संघ सुपर 8 मध्ये पोहोचल्यानं आणि वेस्ट इंडिजमधील मैदानांच्या स्थितीचा आढावा घेतल्यास रोहित शर्मा टीम इंडियात बदल करु शकतो. भारतानं 15 सदस्यांच्या संघात चार स्पिनर्सना संधी दिलेली आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना ग्रुप स्टेजमध्ये संघात स्थान मिळालं नव्हतं. या दोघांशिवाय रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे देखील फिरकी गोलंदाजी करतात. फिरकी गोलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्या दोघांना संघात स्थान देण्यात आलं होतं. रवींद्र जडेजा चांगली फलंदाजी करु शकला नाही. मात्र, अक्षर पटेलनं चांगली कामगिरी केलेली आहे.
कुलदीप यादव संघात आल्यास बाहेर कोण जाणार?
आता वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांचा अंदाज खेत भारतीय संघात फेरबदल होण्याची शक्यता आहे. कुलदीप यादवला रोहित शर्मानं संघात संधी दिल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसावं लागणार याबाबत चर्चा सुरु आहेत. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला संघाबाहेर बसावं लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत.
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग यांनी टीम इंडियाबद्दल भाष्य केलं ते म्हणाले, आतापर्यंत ती गोष्ट घडली नाही, आता मात्र युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यासारखी स्थिती आहे. तुम्ही एक प्रकारचं क्रिकेट खेळण्याची सवय करुन घेऊ शकत नाही. तुम्हाला परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी संघात बदल करावे लागतील. भारताला सुपर 8 मध्ये आक्रमक क्रिकेट घेळण्यासाठी कुलदीप यादवला संघात स्थान द्यावं लागेल. टी20 वर्ल्ड कपच्या शेवटच्या टप्प्यात खेळपट्टीवर टर्न मिळत असेल कुलदीप यादवला संधी द्यावी, असं स्टीफन फ्लेमिंग म्हणाले.
स्टीफन फ्लेमिंग यांनी न्ययॉर्कमध्ये अक्षर पटेलसाठी चांगली स्थिती होती. तर, रवींद्र जडेजासाठी कॅरेबियन बेटांवरील स्थिती फायदेशीर आहे, असं त्यांनी म्हटलं.