T20 World Cup 2024 Final Rohit Sharma: बार्बाडोसच्या मैदानावरची 'पवित्र' माती रोहितनं तोंडात घातली; वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक, Video
T20 World Cup 2024 Final Rohit Sharma: सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला.
T20 World Cup 2024 Final Rohit Sharma: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रोहित शर्माने मातीचे कण तोंडात घातले-
सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला. रोहित शर्मासह सर्वंच खेळाडूंना आनंदाश्रू अनावर झाले. यावेळी रोहित शर्माने अंतिम सामना ज्या खेळपट्टीवर खेळवला गेला, त्या बार्बाडोसच्या खेळपट्टीवर बसून मातीचे कण तोंडात घातले आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ पाहताच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत आहे.
विराट अन् रोहित निवृत्त
भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. तब्बल 17 वर्षानंतर भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजयासह भारतीय क्रिकेटमधील दोन महान क्रिकेटपटूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय टी 20 कारकिर्दीला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. विराट कोहलीनं मॅच संपल्यानंतरच निवृत्तीचे संकेत दिले होते. रोहित शर्मानं यानंतर निवृत्तीबाबत घोषणा केली. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना म्हटलं की गुड बाय म्हणण्यासाठी आताच्या सारखी चांगली वेळ नाही. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी आतूर होतो. आम्ही ती रेषा पार केली आहे त्यामुळं आनंद होतोय, असं देखील रोहित शर्मानं म्हटलं.
विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब-
टीम इंडियाचे सर्वात मोठे योगदान फलंदाजीचे होते. संपूर्ण विश्वचषकात अनुभवी विराट कोहलीची बॅट शांत राहिली. पण जिथे गरज होती तिथे विराट कोहलीने शानदार खेळी करत टीम इंडियाला अशा एकूण धावसंख्येवर नेलं की जिथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. विराट कोहलीच्या 76 धावांच्या शानदार खेळीमुळे विराट कोहलीला सामनावीराचा किताबही देण्यात आला.