(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya : सूर्याला टी 20 च्या कॅप्टनपदाची लॉटरी, हार्दिक पांड्याचं नाव का मागं पडलं? उपकर्णधारपदही गेलं
IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी 20 मालिका आणि एकदिवसीय मालिका होणार आहे.यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारताच्या श्रीलंका (IND vs SL) दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी टी 20 संघ आणि वनडे संघ जाहीर करण्यात आला. एकदिवसीय मालिकेचं नेतृत्त्व अपेक्षेप्रमाणं रोहित शर्माकडे गेलं आहे. या संघात श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रुपात नवा कॅप्टन मिळाला आहे. हार्दिक पांड्याचं नाव पिछाडीवर पडून सूर्यकुमार यादवच्या नावाला निवड समितीनं कर्णधारपदासाठी पसंती दिली.
हार्दिकचं नाव शर्यतीत पण सूर्यानं बाजी मारली
हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं उपकर्णधारपद भूषवलं होतं. हार्दिक पांड्याचं नाव रोहित शर्माच्या टी 20 मधील निवृत्तीनंतर चर्चेत होतं. रोहित शर्मानंतर टी 20 मध्ये कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे जाईल अशी शक्यता असताना सूर्यकुमार यादवचं नाव चर्चेत आलं. निवड समितीनं देखील सूर्यकुमार यादवच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. यामुळं हार्दिक पांड्याला निवड समितीनं का नेतृत्त्वाची संधी दिली नाही अशा चर्चा सुरु आहेत.
हार्दिक ऐवजी उपकर्णधारपद शुभमन गिलकडे
हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपकर्णधारपद भूषवलं होतं. श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत उपकर्णधार पद शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. यामुळं हार्दिक पांड्याला हा एक प्रकारे धक्का मानला जातोय.
हार्दिक पांड्याची संधी का हुकली?
हार्दिक पांड्यानं संघ निवड जाहीर होण्यापूर्वी एकदिवसीय मालिकेतून वैयक्तिक कारणामुळं माघार घेतली होती. निवड समितीनं 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघाची बांधणी करण्याचा विचार केला असावा त्यामुळं सूर्यकुमार यादवला नेतृत्त्व करण्याची संधी दिली गेली. हार्दिक पांड्याच्या दुखापतीचा मुद्दा विरोधात गेला असण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरनं केकेआचा प्रशिक्षक असताना सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद दिलं होतं. आता गंभीरचं प्रशिक्षक झाल्यानं सूर्यकुमार यादवचं नाव वरचढ होतं. हार्दिक पांड्याचा फिटनेस हा सातत्यानं पाहायला मिळत नाही. हार्दिकला सातत्यानं विश्रांती घ्यावी लागते. कर्णधारानं संघाला प्रेरणा देण्यासाठी मैदानावर असणं आवश्यक असतं त्यामुळं ही संधी हार्दिकच्या हातून निसटली आहे. हार्दिक पांड्याकडे श्रीलंका दौऱ्यात उपकर्णधारपद देखील असणार नाही.
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या :