IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ मोडणार सचिन तेंडुलकरचा हा खास विक्रम? पाहा आकडेवारी
IND vs AUS, Test Series : 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत, स्टीव्ह स्मिथला भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम करण्याची संधी आहे.
IND vs AUS, Test Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 39 सामन्यांच्या 74 डावांमध्ये एकूण 11 शतकं झळकावली आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ, रिकी पाँटिंग आणि सुनील गावस्कर हे आहेत. या तिन्ही खेळाडूंनी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात 8-8 शतकं झळकावली आहेत. दरम्यान गावस्कर आणि पॉटिंग हे दोघेही माजी खेळाडू असल्यामुळे आता केवळ स्मिथकडे (Steve Smith) हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला या यादीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत चार सामने खेळवले जाणार आहेत. जर स्टीव्ह स्मिथने यावेळी चार शतकं झळकावली तर तो सचिनला मागे टाकेल आणि भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये शतकं झळकावण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर येईल. तीन शतकं झळकावूनही तो सचिनच्या विक्रमाची किमान बरोबरी करू शकतो. स्मिथचा अलीकडचा फॉर्म पाहता तो हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता नक्कीच आहे. स्टीव्ह स्मिथने मागील 5 कसोटी सामन्यांच्या 8 डावात 81 च्या फलंदाजीच्या सरासरीने एकूण 486 धावा केल्या आहेत. म्हणजेच प्रति डाव 100 च्या फलंदाजीच्या सरासरीपासून तो काही पावलं दूर आहे. यादरम्यान त्याने केवळ द्विशतक आणि एक शतक झळकावलं नाही तर एकदा तो 85 धावांवर बाद झाला आहे. म्हणजेच तो सतत मोठा डाव खेळताना दिसत आहे. तसंच भारतीय संघाविरुद्ध तो नेहमीच दमदार खेळ करताना दिसतो. अशा स्थितीत स्टीव्ह स्मिथ यावेळी सचिनच्या विक्रमाची किमान बरोबरी नक्कीच करू शकतो.
भारताविरुद्ध स्मिथचा रेकॉर्ड कसा आहे?
स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 28 डावांमध्ये त्याने 72.58 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 1742 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 शतकांसह 5 अर्धशतकंही केली आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो 8व्या स्थानावर आहे. आगामी कसोटी मालिकेत तो सहज टॉप-5 मध्ये पोहोचू शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-