Shubman Gill News : टीम इंडियाच्या कॅम्पमधून मोठी अपडेट! शुभमन गिलला आशिया कपमध्ये मिळणार मोठी जबाबदारी, गौतम गंभीरकडून बक्षीस
Shubman Gill Team India vice-captain for Asia Cup : शुभमन गिलचे सध्या नशिब जोरावर आहे आणि भारतीय संघात त्याचा कद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Team India Squad For Asia Cup 2025 : शुभमन गिलचे सध्या नशिब जोरावर आहे आणि भारतीय संघात त्याचा कद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आधीच टीम इंडियाचा महत्वाचा फलंदाज बनलेला गिल नुकताच कसोटी संघाचा कर्णधार झाला होता. ही जबाबदारी सांभाळताना त्याने दिलेला अप्रतिम खेळ संपूर्ण जगाने पाहिला. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत गिलने केवळ सर्वाधिक धावा केल्या नाहीत, तर नेतृत्व करत मालिका 2-2 अशी ड्रॉही साधली. आता या दमदार कामगिरीचं फळ त्याला मिळणार आहे. शुभमन गिलला लवकरच टीम इंडियाच्या टी-20 संघाचा उपकर्णधार घोषित करण्याची शक्यता आहे.
गौतम गंभीर अन् अजित आगरकर देणार मोठी जबाबदारी
अहवालानुसार, आशिया कप 2025 साठी यूएईमध्ये जाणाऱ्या भारतीय संघात गिलला उपकर्णधारपद दिलं जाणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरदरम्यान टी-20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. म्हणजेच आता गिलच टीम इंडियाचा टी-20 उपकर्णधार असणार, आणि यावरून पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर त्याला या महत्वाच्या भूमिकेत पाहत आहेत, हे स्पष्ट होतं.
🚨 SHUBMAN GILL AS VICE-CAPTAIN 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) August 10, 2025
- Gill is likely to be the Vice Captain in the Asia Cup 2025. [RevSportz] pic.twitter.com/UXqyU02kt7
गिल शेवटचा टी-20 सामना कधी खेळला होता?
गिलला उपकर्णधार बनवल्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये कायम ठेवण्याच्या तयारीत आहे, हे दिसून येतं. गिलने टीम इंडियासाठी आपला शेवटचा टी-20 सामना ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता. त्यानंतर तो फक्त टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये दिसत होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी, टेस्ट क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याच्या सातत्यपूर्ण फॉर्ममुळे त्याला पुन्हा टी-20 संघात बोलावण्यात आलं आहे.
25 वर्षीय गिलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 30 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. गिल हा त्या मोजक्या भारतीय फलंदाजांपैकी एक आहे, ज्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. टी-20 मध्ये त्याच्या नावावर 1 शतक आणि 3 अर्धशतकं आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गिल आधीच वनडे संघाचा उपकर्णधार आहे आणि लवकरच या फॉरमॅटची कर्णधारपदाची सूत्रं, जी सध्या रोहित शर्माच्या हातात आहेत, त्याच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -





















