(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK : पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर संपूर्ण टीम इंडिया गारद, आशिया चषकात पहिल्यांदाच झाला असा विक्रम
IND vs PAK Stats & Records : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 धावांचे आव्हान ठेवलेय.
IND vs PAK Stats & Records : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 धावांचे आव्हान ठेवलेय. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारताचा संपूर्ण डाव 48.5 षटकांत 266 धावांत संपुष्टात आला. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. त्याशिवाय इशान किशन याने 82 धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने 90 तर इशान किशन याने 81 चेंडूचा सामना केला. हार्दिक आणि इशान यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावसंख्या ओलांडता आली नाही. जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या केली.
भारताचे दहा फलंदाज वेगवान गोलंदाजाचे शिकार ...
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी विक्रमी कामगिरी केली आहे. भारताच्या 10 फलंदाजांना वेगवान गोलंदाजांनी तंबूत धाडलेय. आशिया चषकाच्या इतिहासात एखाद्या संघाचे दहा फलंदाज वेगवान गोलंदाजांनी बाद करण्याची पहिलीच वेळ आहे. हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर जमा झालाय. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताविरोधात टिच्चून गोलंदाजी केली. शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या तिकडीने भारताचा संपूर्ण संघ बाद केला. शाहिन शाह आफ्रिदी याने 4 विकेट घेतल्या. तर नसीम शाह आणि हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.
पाकिस्तानची गोलंदाजी कशी राहिली -
शाहीन शाह आफ्रिदी याने 10 षटकात 35 धावा खर्च करत चार फलंदाजांना बाद केले. शाहीन आफ्रिदी याने कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा या स्टार फलंदाजांना तंबूत धाडले. नसीम शाह याने तळाची फलंदाजी बाद केली. नसीम शाह याने शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना बाद केले. हॅरिस रौफ याने शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना तंबूत पाठवले. हॅरिस रौफ याने 9 षटकात 58 धावा खर्च केल्या. तर नसीम शाह याने 8.5 षटकात 36 धावा दिल्या. शाहीन आफ्रिदी याने 10 षटकात दोन षटके निर्धाव फेकली. शादाब खान, मोहम्मद नवाज आणि आगा सलमान यांना एकही विकेट मिळाली नाही.
पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचे आव्हान -
भारतीय संघाने पाकिस्तानसमोर 267 धावांचे आव्हान दिलेय. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल. रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंची त्यांना साथ असेल. पाल्लेकेले येथे लो स्कोरिंग सामन्याचा इतिहास आहे, त्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.