SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022: सौराष्ट्रानं नाणेफेक जिंकलं, महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण
SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022 Final: या स्पर्धेत सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. तर, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी विरोधी संघातील गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलंय.
SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रानं नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. महाराष्ट्राचा संघानं पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिलीय. तर, सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. या स्पर्धेत सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. तर, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी विरोधी संघातील गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलंय.
या स्पर्धेतील सेमी फायनल सामन्यात महाराष्ट्रानं आसामचा पराभव करत फायनल गाठली. तर, सौराष्ट्रनं कर्नाटकला पराभवाची धुळ चार फायनलचं तिकीट मिळवलं. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील फायनल सामना अतिशय रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
सौराष्ट्र- महाराष्ट्र यांच्यातील सामना कधी, कुठं पाहायचा?
सौराष्ट्र आणि महाराष्ट्र यांच्यात आज विजय हजारे ट्रॉफीच्या फायनल सामना खेळला जातोय. अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर सकाळी 9 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी तुम्ही डिस्ने प्लस हॉट स्टार वर लॉग इन करू शकता. तसेच या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही https://marathi.abplive.com/news/sports या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
सौराष्ट्राचे गोलंदाज विरुद्ध महाराष्ट्राचे फलंदाज
सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनादकट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या संपूर्ण स्पर्धेत त्यानं सातत्यानं दमदार गोलंदाजी केलीय. सेमी फायनल सामन्यात त्यानं 26 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या होत्या. तर, प्रेरक मंकडनं 34 धावांत विकेट्स बळी घेतल्या आणि 35 धावा केल्या. दुसरीकडं महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं क्वार्टर फायनलमध्ये 220 आणि सेमी फायनलमध्ये 168 धावांची खेळी केली. महाराष्ट्राच्या अंकित बावणेनंही 110 धावांची मोठी खेळी करत संघाला फायनलचं तिकीट मिळवून देण्यास मदत केली. यामुळं अंतिम सामन्यातसौराष्ट्रची गोलंदाजी आणि महाराष्ट्राची फलंदाजी यांच्यात रंजक लढत पाहायला मिळेल.
महाराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी, सौरभ नवले (विकेटकिपर), मनोज इंगळे, मुकेश चौधरी, पवन शहा, नौशाद शेख
सौराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:
हार्विक देसाई (विकेटकिपर), शेल्डन जॅक्सन, जय गोहिल, समर्थ व्यास, प्रेरक मंकड, अर्पित वसावडा, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), कुशांग पटेल, पार्थ भुत
हे देखील वाचा-