Team India : 'नसीब में होगा तो अपना टाईम भी आयेगा', भारतीय टेस्ट संघात संधी हुकल्यावर सरफराजची प्रतिक्रिया
Sarfaraz Khan: सरफराज खानने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, तो सूर्यकुमार यादवकडून प्रेरणा घेतो, कारण सूर्याही अशा परिस्थितीतून गेला आहे.
Sarfaraz Khan, IND vs AUS : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन हंगामात चमकदार कामगिरी करुनही मुंबई संघाच्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया वि. भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच्या संघात संधी मिळालेली नाही. सातत्याने दमदार कामगिरी करुनही सरफराजला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ सतत वक्तव्यं येत आहेत. त्यानंतर आता स्वत: सरफराज खाननं आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'द टेलिग्राफ'शी बोलताना सरफराज खान म्हणाला, 'जर नशिबात असेल तर माझा टाईमही येईल, निवड माझ्या हातात नाही. मी क्रिकेट खेळतो कारण मला ते आवडते आणि मी ते करत राहीन. मी कशाचीही अपेक्षा करत नाही कारण अपेक्षांमुळे निराशाच येते. मी कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतो आणि बाकीचे नशिबावर सोडतो. या प्रकरणात तो सूर्यकुमार यादवकडून खूप काही शिकतो, असंही सरफराजने म्हटलं आहे. तो म्हणाला की, 'मी सूर्यकुमार यादवकडून खूप काही शिकलो आहे. त्यालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला आणि आता तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरीही त्याने कधीही आशा सोडली नाही, उलट तो अधिक भक्कम झाला. मी सूर्याशी सतत बोलत राहतो आणि तो मला नेहमी संधीची वाट पाहण्यास सांगतो. माझे प्रशिक्षक अमोल मुझुमदार सरही मला सतत प्रोत्साहन देत असतात.
सरफराजची फर्स्ट क्लास कारकीर्द
सरफराज खानने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 37 सामन्यांच्या 54 डावांमध्ये 79.65 च्या फलंदाजीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने आपल्या छोट्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 3505 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकदा त्रिशतकही ठोकलं आहे. गेल्या तीन मोसमापासून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. पण असं असूनही या खेळाडूला आतापर्यंत कसोटी संघात स्थान मिळवता आलेले नाही. बांगलादेश दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर झाले असून सरफराजची या सामन्यांसाठी निवड झालेली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या फलंदाजाने 2019-20 मध्ये 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या. यानंतर 2021-22 मध्ये त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. 2022-23 च्या मोसमातही त्याने आतापर्यंत 900 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 53 डावांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 80 पेक्षा जास्त आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत, तो दिग्गज माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डॉन ब्रॅडमननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-