Rohit Sharma : टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा कामगिरीवर परिणाम झाला का? रोहितनं करारी बाणा दाखवला, उत्तर देत म्हणाला..
IND vs SL : रोहित शर्मानं तिसरी मॅच संपल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटशनमध्ये विविध प्रश्नांची उत्तर दिली. श्रीलंकेनं चांगला खेळ केला त्याचं श्रेय त्यांना द्यायला हवं, असं रोहित म्हणाला.
कोलंबो: भारतानं(Team India) श्रीलंकेविरुद्धची (Ind vs SL) मालिका 2-0 अशी गमावली आहे. श्रीलंकेनं (Sri Lanka) तिसऱ्या वनडेत भारताला 110 धावांनी पराभूत करत मालिका जिंकली. तिसरी मॅच संपल्यानंतर रोहित शर्मानं (Rohit Sharma) पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कार्यक्रमात विविध प्रश्नांची उत्तर दिलं. यावेळी रोहित शर्माला समालोचकानं तुम्ही टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानं आत्मसंतुष्टता म्हणजेच समाधानी झाला होता का असा सवाल केला. यावर रोहित शर्मानं करारी बाणा दाखवत उत्तर दिलं. तो म्हणाला, जेव्हा तुम्ही भारतीय संघासाठी खेळत असता त्यावेळी असं काही घडत नाही, असा प्रश्न म्हणजे विनोद आहे. तुम्ही जेव्हा भारतासाठी खेळता तेव्हा आत्मसंतुष्टता असं काही नसतं. श्रीलंकेच्या संघानं आमच्या पेक्षा चांगला खेळ केला, त्यांना विजयाचं श्रेय दिलं पाहिजे, असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की आमच्यासमोर काही समस्या आहेत. आम्हाला गांभीर्यानं वैयक्तिक गेम प्लानवर लक्ष द्यावं लागेल. आजच्या सामन्यात आम्ही काही काळ दबावात होतो, आम्ही इथं प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकेनं या मालिकेत चांगला खेळ केला. त्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल, असंही रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्मा यासंदर्भात बोलताना म्हटलं की, आमच्याकडे अनेक खेळाडू आहेत, त्यांना संधी द्यायची होती. आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही. फिरकीपटू कशी गोलंदाजी करतात हे पाहावं लागणार आहे. आम्हाला काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागणार आहे. मालिका गमावली म्हणजे जग संपलं असं होत नाही, या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली . यातून बाहेर पडून चांगली कामगिरी करण्यावर आमचं लक्ष असेल, असं रोहित शर्मा म्हणाला.
तीन सामन्यांची मालिका श्रीलंकेनं 2-0 नं जिंकली
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे मॅच टाय झाली. श्रीलंकेनं पहिल्या मॅचमध्ये 230 धावा केल्या होत्य. भारतीय संघ 230 धावांवर बाद झाल्यानं मॅच टाय झाली होती. तर, दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव झाला. तर, तिसऱ्या वनडे मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताला 110 धावांनी पराभूत करत मालिका 2-0 नं जिंकली. श्रीलंकेनं भारतावर 27 वर्षानंतर विजय मिळवला. श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेल्लालगे यानं तीन मॅचमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. यामुळं त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला.
संबंधित बातम्या :