Asia Cup 2023: ना हार्दिक सलामीला येणार, ना अश्विनला दार बंद, रोहित-आगरकरचं A टू Z प्लॅनिंग
आशिया चषकासाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. अजित आगकरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने 17 जणांच्या चमूची निवड केली.
Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. अजित आगकरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने 17 जणांच्या चमूची निवड केली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याशिवाय टीम इंडियाच्या प्लॅनिंगबाबतही स्पष्ट शब्दात उत्तरे दिली. दरम्यान, हार्दिक पांड्या याला आशिया चषकासाठी उप कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याशिवाय युवा तिलक वर्मा यालाही संधी देण्यात आली आहे. तिलक वर्मा याने आतापर्यंत एकही वनडे सामना खेळलेला नाही.
फलंदाजीच्या बदलत्या स्थानावर काय म्हणाले -
बॅटिंग ऑर्डरमध्ये सतत होणाऱ्या बदलावर आगरकर आणि रोहित शर्मा यांनी उत्तरे दिली. रोहित शर्मा म्हणाला की, संघात आम्हाला फ्लेक्सिबिलिटी हवी आहे. आम्ही विचार करुनच निर्णय घेतो. पण याचा अर्थ असा नाही की हार्दिक पांड्या सलामीला येणार अन् आघाडीचे फलंदाज तळाला फलंदाजी करायला जाणार आहेत. चार, पाच आणि सहाव्या क्रमांकावर प्लेक्सिबलिटी हवी आहे.
मागील चार पाच वर्षांपासूनचे टीम इंडियाचे क्रिकेट पाहिले तर सलामी आणि नंबर तीनवर कोणताही बदल केला नाही. आघाडीचे खेळाडू ठरलेले आहेत. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळत होता. याशिवाय उर्वरित खेळाडूंमध्ये लवचिकता असली पाहिजे. मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीही केली आहे.
अय्यर पूर्णपणे फिट, राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, संजूला मिळाली संधी
टीम इंडियाच्या निवड समितीच अध्यक्ष अजित आगरकर यांनी आशिया चषकासाठी संघाची घोषणा केली. त्याशिवाय केएल राहुलच्या फिटनेसबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही दिले. आगरकर म्हणाले की, केएल राहुल अजूनही दुखापतीचा सामना करत आहे. त्याला थोडासा त्रास होतोय, पण तो त्याच्या दुखापतीबद्दल नाही. अशा परिस्थितीत आम्ही बॅकअप खेळाडू म्हणून संजू सॅमसनचा संघात समावेश केला आहे.
आगरकर पुढे म्हणाला की, राहुलला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आशिया चषकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापर्यंत वेळ लागेल. ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही संजू सॅमसनचा बॅकअप खेळाडू म्हणून संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्याच्या फिटनेसची संपूर्ण माहिती लवकरच देऊ.
श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, अय्यरला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. राहुल आणि अय्यर हे दोन्ही खेळाडू बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, राहुलशिवाय इशान किशनलाही यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे. तर संजू सॅमसन याला बॅकअप म्हणून निवडलेय.
संघात तीनच गोलंदाज, अक्षर पटेलला का दिली संधी ?
आशिया चषकासाठी संघात तीन खेळाडूंनाच संधी देण्यात आली. कुलदीप यादव प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. तर रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांना अष्टपैलू म्हणून स्थान दिलेय. चहल आणि अश्विन यांना संघात स्थान मिळाले नाही. याबाबत रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला.
भारतीय संघाच्या निवडीदरम्यान लेग-स्पिनर आणि ऑफ-स्पिनर दोघांसाठीही चर्चा झाली. पण आम्हाला अशा खेळाडूची निवड करायची होती ज्याच्याकडे 8 किंवा 9 क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. अक्षरने या वर्षात आतापर्यंत कमालीची कामगिरी केली आहे. त्याला संघात घेतल्याने आम्हाला डावखुरा खेळाडूचा पर्यायही मिळतो, ज्याच्याकडे वरतीही फलंदाजी करण्याची क्षमताही आहे. निवडीच्या वेळीही आम्ही अश्विन आणि चहलबद्दल चर्चा केली होती. पण फक्त १७ खेळाडूंचा समावेश असल्याने आम्ही स्थान देऊ शकलो नाही. पण आशिया चषकात संधी मिळाली नाही म्हणजे विश्वचषकासाठी अश्विन-चहल आणि सुंदर यांची दारे बंद झाली असे नाही, असे रोहित शर्मा म्हणाला.
आशिया चषकासाठी भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)