(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma On IPL: आयपीएललाही टाटा-बाय-बाय...?; टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान
Rohit Sharma On IPL: टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहित शर्माला आयपीएलमध्ये खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
Rohit Sharma On IPL: भारतीय संघाने 2 जून रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामध्ये रवींद्र जडेजाही सामील झाला आहे. रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहित शर्माला आयपीएलमध्ये खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर मी आयपीएलमध्ये खेळणं सुरु ठेवणार असल्याचं रोहित शर्माने सांगितले. मी टी-20 मधून देखील निवृत्ती घेण्याचा विचार केला नव्हता. मात्र परस्थिती तशी निर्माण झाली आणि याशिवाय चांगला वेळ नाही, म्हणून मी आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीचा घोषणा केली. तसेच मी 100 टक्के आयपीएल खेळणार असल्याचं रोहित शर्माने यावेळी स्पष्ट केलं.
निवृत्ती जाहीर करताना रोहित नेमकं काय म्हणाला?
रोहित शर्मा म्हणाला की, मी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कधीही विचार केला नव्हता, परंतु टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यापेक्षा चांगले काय असू शकते. मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही, मला जे आतून चांगले वाटते तेच मी करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक झाल्यानंतरही मी हा विश्वचषक खेळू की नाही याचा विचार केला नव्हता. मी टी-20 मधून निवृत्ती घेईन असे कधीच वाटले नव्हते, पण सध्याची परिस्थिती अतिशय योग्य आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती घेणं हा एक अद्भुत अनुभव आहे, असं रोहित शर्माने सांगतिले.
विराट, रोहितला ड्रेसिंग रुममध्ये समजवण्याचा प्रयत्न
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्काच बसला. मात्र दोघांच्या या घोषणेनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं, याबाबत सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना निवृत्तीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आणखी एक टी-20 विश्वचषक खेळण्याची विनंती करत समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी ऐकलं नाही, असं सूर्यकुमार यादवने सांगितले. रोहित शर्मा आणि विराट कोहली डगआऊट, ड्रेसिंग रुममध्ये बसले होते, तेव्हा आम्ही म्हणत होतो, दोन वर्षांनी भारतात विश्वचषक होणार आहे. आता हा निर्णय घेऊ नका, पुढच्या वर्षी बघू. पण दोघांनीही आधीच सर्व काही ठरवलं होतं, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.
रोहित-विराट वनडे आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करणार -
विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हे दोन खेळाडू आता टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाहीत. कोहली आणि रोहित आता वनडे आणि टेस्ट फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करतील. टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी युवा खेळाडूंची निवड केली आहे.