America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
America : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादलं होतं.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलेलं आहे. याशिवाय भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यानं ट्रम्प यांनी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ भारतावर लादलेलं आहे. म्हणजेच अमेरिकेनं भारतावर एकूण 50 टॅरिफ लादलं आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानं अमेरिकेकडून सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. भारतावर लादलेलं अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ रद्द होऊ शकतात असे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत.
भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ रद्द होणार?
अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ हटवण्यासंदर्भात एक मार्ग काढला जाऊ शकतो, असं म्हटलं आहे. पॉलिटिकोला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की भारतानं रशियन क्रूड ऑईलची खरेदी कमी केली आहे. यामुळं टॅरिफ आता हटवलं जाऊ शकतं.
स्कॉट बेसेंट यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाचं हे यश असल्याचं म्हटलं. आम्ही भारतावर रशियन तेल खरेदी केल्यामुळं 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. आता भारतीय रिफायनरींकडून रशियन तेल खरेदी जवळपास बंद करण्यात आली आहे. हे मोठं यश आहे. ते म्हणाले की 25 टक्के टॅरिफ अजूनही लागू आहे. आता ते हटवण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो.
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु होण्यापूर्वी भारतातील तेल रिफायनरी कंपन्या रशियन क्रूड ऑईल 2-3 टक्के खरेदी करत होत्या. मात्र, युद्धामुळं पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातले असता रशियानं सवलतीच्या दरात तेल विक्री सुरु केली. भारतानं रशियाकडून तेल खरेदी वाढवली. भारताची रशियन तेलाची खरेदी 15-19 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. यामुळं भारतीय रिफायनरींना मोठा नफा देखील झाला.
अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादत रशियन तेल खरेदीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. स्कॉट बेसेंट यांच्या मते भारतीय रिफायनरीज रशियाकडून तेल खरेदी कमी करत असून त्या पश्चिम आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेकडून तेल खरेदी करत आहेत.
स्कॉट बेसेंट यांनी यूरोपियन देशांवर यावेळी टीका केली. यूरोपमधील देश रशियाविरोधात बोलतात. मात्र, भारतीय रिफायनरजीकडून बनवण्यात आलेल्या रिफाइंड उत्पादनांची खरेदी करतात, जे रशियन क्रूडपासून बनवलेलं असतं. यामुळं यूरोपमधील देश अप्रत्यक्षपणे रशियाला अर्थसहाय्य करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशिया आणि यूक्रेन युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले होते. मात्र, त्याला यश आलं नव्हतं.
दरम्यान भारताची तेल खरेदीबाबतची भूमिका जागतिक मार्केटमधील स्थितीवर आणि देशातील ग्राहकांचं हित लक्षात घेत निश्चित होत असते.

























