सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
मी आभारी आहे त्यांनी आम्हाला भरभरून मतदान दिले आहे, मुंबईकरांचे देखील आभारी आहे, महाराष्ट्रात 125 जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे.

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकामध्ये मुंबई (Mumbai) महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, मुंबई महापालिकेत भाजपने सर्वाधिक 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. तर, ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र, या निवडणुकीत लक्षवेधी ठरला तो एमआयएम पक्ष. एमआयएमने (MIM) राज्यात 125 हून अधिक जागांवर यश मिळवलं असून मुंब्रा येथून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनाच थेट टक्कर दिली. येथील सहर शेखसह 4 उमेदवार एमआयएमचे विजयी झाले आहेत. मात्र, सहर शेखच्या विजयानंतर तिने केलेल्या भाषणाचीच सर्वत्र चर्चा रंगली होती. संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, असे तिने आपल्या स्टाईलने म्हटले होते. आता, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांनी सहर शेखच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. तसेच, तिच्या वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
मी आभारी आहे त्यांनी आम्हाला भरभरून मतदान दिले आहे, मुंबईकरांचे देखील आभारी आहे, महाराष्ट्रात 125 जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे. असदुद्दीन ओवैसींपेक्षा मोठा नेता कोणता आहे असे वाटत नाही. कारण संविधान वाचवायला ते सांगत आहेत. जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचे सरकार आले, तेव्हापासून हिंदू राष्ट्र करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यात सहभागी आहे. कारण, सत्तेसाठी हे एकत्र आले आहेत. एमआयएम हिरव्या रंगाची आहे, असे सगळे बोलत होते. मात्र, मुंबईत आमचे जे नगरसेवक निवडून आणले आहे, त्यांना आम्ही मुंबईची जबाबदारी देणार आहोत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.
अनेक शहरात आम्ही एससी, ओबीसी लोकांना निवडून आणले आहे. मुंब्रामध्ये जेव्हा हिरवा-भगवा करत होते तेव्हा मयूर सारंग यांना देखील आम्ही तिकीट दिले होते, ते देखील निवडून यायला पाहिजे होते. आम्ही हिंदू लोकांना देखील तिकीट दिले आहे, जनता आमच्यासोबत आहे, ओवेसी यांनी परदेशात जाऊन लोकसभेत देखील कशी भूमिका मांडली होती. पण, ज्यांना भुंकायचे आहे, त्यांनी भुंकावे असेही जलील यांनी म्हटले. तसेच, माझ्या गाडीत भगवा हिरवा सगळे रंग होते, तुम्ही देशाला रंगात वाटले आहे, कोणता रंग कोणत्या जातीसोबत हे तुम्ही जोडले आहे, रंगावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असे म्हणत जलील यांनी भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांचा एक व्हिडिओ दाखवला.
अनेक आमदार मुसलमान विरोधात बोलतात, त्यांच्यावर काय कारवाई केली? एक तोत्रा येतो आणि तुम्ही इतका मोठा विवाद करता, त्यांनी आणले त्यापेक्षा जास्त माणसे मी आणू शकतो. तुमची सत्ता आहे तर कानून तुमच्यासारखे चालणार का? मी विचारतो की कोणत्या नियमाखाली पोलिसांनी या लहान मुलीला नोटीस पाठवली? तिने जे स्टेटमेंट दिले त्यावरून आम्ही मागे हटणार नाही, ती जे बोलली त्याला आम्ही सपोर्ट करतो, अशी भूमिका देखील इम्तियाज जलील यांनी मांडली. तसेच,फक्त मुंब्रा नाही संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चांगल्या प्रकारे हिरवा रंग पसरवू, हे मी ठणकावून सांगतो, असेही ते म्हणाले.
किरीट सोमय्यांचा व्हिडिओ लावणार
मी त्या तोत्राला सांगतो तू त्या लहान मुलीवर कायदा लावला आज मी बोललो तर माझ्याविरुद्ध तक्रार दे. पुन्हा तो तोत्रा जर मुंब्रामध्ये आला, तर मुंब्रामध्ये चौका चौकात मी त्याचे व्हिडिओ लावणार, आधी तुमचे चरित्र बघा नंतर आरोप करा, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही त्यांनी टीका केली. इतक्या लोकांनी आम्हाला मतदान दिले आहे तर आम्ही मुंब्य्राच्या विकासासाठी काम करणार आहोत. आम्ही माफीनामाबद्दल सहरला विचारले होते, तिला सांगितले होते की, माफी मागायची नाही. तिने स्टेटमेंट दिले होते, मुंब्रा हिरवा करणार, जसे गिरीश महाजन यांनी नाशिकमधील हिरवळ कमी करायचे ठरवले होते, त्या दृष्टीने तुम्ही का नाही बघत? असा सवाल जलील यांनी विचारला.
एकनाथ शिंदेंना प्रॉब्लेम होईल
एकनाथ शिंदे म्हणतात की पूर्ण ठाणे भगवा आहे, तर ते चालते आणि मी म्हणालो की मुंब्रा हिरवा आहे तर त्यात तुम्हाला प्रॉब्लम आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगू नये, जर मी तोंड उघडले तर त्यांना देखील खूप प्रॉब्लम होईल. भाजप त्यांना कधी उचलून फेकेल याची त्यांनी चिंता करावी. संभाजीनगर इथे त्यांचे पालकमंत्री त्यांचे पाच आमदार आहेत तरी माझे 33 आणि त्यांचे किती नगरसेवक निवडून आले याची माहिती घ्या, असे का झाले? असे म्हणत एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल केला.
हेही वाचा
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
























