Rohit Sharma : रोहित शर्मा अन् विराट कोहलीनंतर भारताच्या टीमचे आधारस्तंभ कोण? माजी बॅटिंग कोच दोघांची नाव घेत म्हणाले...
Rohit Sharma : टी 20 क्रिकेटमधून विराट कोहली आणि रोहित शर्मानं निवृत्ती जाहीर केली आहे. या दोघांनंतर भारताच्या संघाचे आधारस्तंभ कोण असणार याबाबत विक्रम राठोड यांनी भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली : भारतानं रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात तब्बल 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्मा 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. रोहित शर्मानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. रोहित शर्मासह विराट कोहली(Virat Kohli) , रवींद्र जडेजा यांनी देखील निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची टी 20 क्रिकेटमधील जागा कोण भरुन काढणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांची जागा भरुन काढणार याविषयी भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी भाष्य केलं आहे. विक्रम राठोड यांनी टीम इंडियाच्या दोन युवा खेळाडूंच्या नावाला पसंती दिली आहे.
विक्रम राठोड यांनी कुणाची नावं घेतली?
विक्रम राठोड यांनी नुकत्याच पार पडलेल्या झिम्बॉब्वे आणि भारत यांच्यातील टी 20 मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्या नावाला पसंती दिली आहे. शुभमन गिलनं झिम्बॉब्वे विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. यशस्वी जयस्वालनं तीन सामने खेळले मात्र सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जागा भरुन काढणं सोपं असणार नाही. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि झिम्बॉब्वे मालिकेत भारताच्या टी 20 क्रिकेटमधील भविष्याची झलक दिसली आहे, असं विक्रम राठोड म्हणाले.
विक्रम राठोड पुढं म्हणाले की भारतीय क्रिकेटमध्ये सध्या जे स्थित्यंतर आहे त्याबाबत फारशी चिंता नाही. भारताच्या क्रिकेटमध्ये खूप टॅलेंट आहे. अनेक खेळाडू नव्या कौशल्यासह समोर येत आहेत. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासह इतर खेळाडू स्वत:ला सिद्ध करतील आणि स्थित्यंतर सहजपणे होईल, असं विक्रम राठोड यांनी सांगितलं.
एकदिवसीय सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सारखे फलंदाज जबाबदारी पार पाडतील, असं देखील राठोड यांनी म्हटलं. आता अनेक खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये आहेत. मात्र, येणाऱ्या काळात वनडे, कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये भारतासाठी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल अनेक वर्ष धुरा सांभाळतील, असं विक्रम राठोड म्हणाले. आगामी श्रीलंका दौऱ्यात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल कशी कामगिरी करतात हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :