(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराट-रोहितच्या वापसीने हार्दिक पांड्याची पुरती अडचण; दुखापतीनेही घोळ केला!
IND Vs AFG : अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत भारताचे सर्वात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टीम इंडियात कमबॅक झालेय. या दोघांच्या कमबॅकनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले.
IND Vs AFG : अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत भारताचे सर्वात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टीम इंडियात कमबॅक झालेय. या दोघांच्या कमबॅकनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. 14 महिन्यानंतर विराट आणि रोहित यांनी टी 20 मध्ये कमबॅक का केलं? निवड समितीला हा निर्णय का घ्यावा लागला? यासारखे प्रश्न चाहत्यांच्या मनात काहूर माजत असतील. टी 20 विश्वचषकाआधी निवड समितीने अनुभवी रोहित आणि विराट कोहली यांच्यावर पुन्हा एकदा का विश्वास दाखवला? हे समजणं तितकेही अवघड नाही..
मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा जगातील सर्वात शानदार फलंदाजांपैकी आहेत. रेकॉर्ड्स पाहिलं तर सध्याचा एकही खेळाडू त्यांच्या आसपासही नाही. रोहित आणि विराट या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा अलीकडचा फॉर्म पाहता त्यांच्या निवडीकडे दुर्लक्ष करणे निवड समितीला शक्य नव्हते. रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात संघाला विस्फोटक सुरुवात करून दिली. रोहितने स्ट्राइक रेटबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्याच्या विश्वचषकातील कामगिरीसह उत्तरेही दिली. विराट कोहलीनेही जवळपास प्रत्येक सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि अँकरच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे विराट कोहलीचा दावाही बळकट आहे.
रोहित-विराट कोहलीचं कमबॅक का झालं ?
हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांची दुखापत रोहित आणि विराट या जोडीच्या पथ्यावर पडली. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची बॅटिंग ऑर्डरमध्ये अनुभव कमी दिसत होता. त्याशिवाय नेतृत्व म्हणून अन्य एकही खेळाडू अद्याप तयार झालेला नाही.
हार्दिक आणि सूर्याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जागा भरुन काढण्यात रोहित शर्माशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाचं सर्वांनीच कौतुक केले. त्याशिवाय ड्रेसिंग रुममधील वातावरणही सकारात्मक होतं. दुसरीकडे विराट कोहलीकडे परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता आहे. विराट कोहली कोणत्याही क्षणाला आपला खेळ बदलू शकतो. मागील टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली भारताचा बेस्ट फलंदाज होता. या सर्व कारणामुळे रोहित आणि विराट कोहली यांचं टी 20 मध्ये कमबॅक झालेय.
दरम्यान, हार्दिक पांड्याला टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं, तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. असे मानले जात होते की संघ आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा कमीत कमी टी-20 फॉरमॅटमध्ये पुढे गेला आहे. या दोघांना वगळण्याचे एक कारण म्हणजे दोन्ही विश्वचषकातील खराब कामगिरीसाठी टॉप ऑर्डरला जबाबदार धरण्यात आले. टॉप 3 मध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीमुळे संघाला या फॉरमॅटमध्ये अपेक्षित सुरुवात होत नव्हती. रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये फलंदाजी करत नव्हता, तर विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.