Ravindra Jadeja Controversy : जाडेजावरील बॉल टॅम्परिंगच्या आरोपानंतर टीम इंडियाने दिलं मॅच रेफरीला उत्तर, काय आहे नेमकं प्रकरण?
India vs Australia: भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सामन्यादरम्यान जाडेजाने नेमकं आपल्या हातावर कोणत्या प्रकारची क्रीम वापरली होती ते सांगितलं आहे.
IND vs AUS, Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात नागपुरात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 177 धावांवर सर्वबाद झाला होता. ज्यानंतर भारतीय संघ आपला पहिला डाव खेळत आहे. दरम्यान गोलंदाजी करताना भारताकडून रवींद्र जाडेजाने सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी करत 5 बळी घेतले. त्याच्या या अप्रतिम गोलंदाजीनंतर लगेचच जाडेजाबाबत वाद सुरु झाला. ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्या थेट बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. ज्याबाबत टीम इंडियाने आयसीसी मॅच रेफरीला उत्तर दिले आहे.
बोटं दुखत असल्याने जाडेजाने मलम लावलं : टीम इंडिया
नागपूर कसोटीचा पहिला दिवस संपल्यानंतर जाडेजा, कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने व्हिडीओ क्लिप पाहिली. या व्हिडीओ क्लिपमध्ये जाडेजा हाताच्या बोटांवर काहीतरी लावताना दिसत होता. याविषयी असा दावा केला जात होता की त्याने बॉल टॅम्परिंगचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याने असं कोणतंही कृत्य केलं नसल्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट झालं. क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार, टीम इंडियाने आयसीसी मॅच रेफरीला उत्तर दिलं आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की जाडेजाची बोटं दुखत असल्याने त्याने बोटांवर मलम (Balm) लावला होता. जाडेजाबाबत सुरु झालेल्या वादाला ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलून धरलं. अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावरही क्रिकेट चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
कसा होता ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव?
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावाचा विचार करता सर्वात आधी नाणेफेक (Toss Update) जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा हा मनसुबा हाणून पाडला. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजने बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी सर्वात कमाल गोलंदाजी करणाऱ्या जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-