रिकी पाँटिंगच्या दाव्यावर पलटवार, रवी शास्त्री म्हणाले भारत विजयाची हॅटट्रिक करणार, बॉर्डर गावसकर ट्रॉफीबाबत मोठं भाष्य
Ravi Shastri : भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यानं रिकी पाँटिंगचा दावा खोडून काढला आहे. भारत बॉर्डर गावसकर ट्रॉफी तिसऱ्यांदा जिंकेल असं ते म्हणाले.
Ravi Shastri नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान होणार आहे. या मालिकेला बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) असं देखील म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंगनं बॉर्डर गावसकर ट्रॉफीबाबत मोठी भविष्यवाणी केली होती. ऑस्ट्रेलिया या मालिकेत विजय मिळवेल, असा दावा रिकी पाँटिंगनं (Ricky Ponting) केला होता. तर,ऑस्ट्रेलिया पाच पैकी तीन सामने जिंकेल, भारत एक मॅच जिंकेल तर एक मॅच अनिर्णित राहील, असं दावा रिकी पाँटिंगनं केला होता. भारतानं यापूर्वी दोनदा बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri ) यांनी पाँटिंगचा दावा खोडून काढला आहे, भारत बॉर्डर गावसकर ट्रॉफी विजयाची हॅटट्रिक करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
रवी शास्त्री यांनी आयसीसीसोबत बोलताना म्हटलं की, ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. भारतानं यापूर्वी दोनदा ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. ऑस्ट्रेलियाला जवळपास दहा वर्ष बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकता आलेली नाही. गेल्या पाच ते आठ वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघ कधी आमने येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.ही एक चागंली मालिका असेल, भारताच्या संघाकडे बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकत हॅटट्रिक करण्याची संधी आहे. कारण, भारताचे गोलंदाज फिट असून भारतानं चांगली फलंदाजी केल्यास पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला पराभूत करु शकतात.
रवी शास्त्री पुढं म्हणाले की, आस्ट्रेलियाचा संघ बदल्यासाठी आतूर असेल, त्यांचा भारताला पराभूत करण्याचा प्रयत्न असेल, कारण आपण त्यांना दोनदा पराभूत केलेलं आहे. ऑस्ट्रेलियाचं आक्रमक धोरण कायम राहणार आहे. दीर्घकाळापासून ऑस्ट्रेलिया चांगल्या वेगवान गोलंदाजांसह आक्रमक गोलंदाजी करते. नॅथन लायनची गोलंदाजी देखील ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरते. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका जिंकायची असल्यास त्यांना प्रत्येक मॅचमध्ये 20 विकेट घ्यावा लागतील, असं रवी शास्त्री म्हणाले.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताचे फलंदाज कशाप्रकारे फलंदाजी करतात हे पाहायला लागणार आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यांच्याशिवाय रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा यांचे पर्याय असतील. मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग यांना देखील संधी मिळू शकते. भारताकडे बॉर्डर गावसकर ट्रॉफीत विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक
पहिली कसोटी- 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी- 06 ते 10 डिसेंबर, एडिलेड
तिसरी कसोटी- 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी - 26ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी-03 ते 07 जानेवारी,सिडनी
संबंधित बातम्या :