(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranji Trophy 2022 final : रणजी फायनलचा पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला; मुंबई 248 वर 5 बाद
Ranji Trophy : मुंबईने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मध्यप्रदेशच्या खेळाडूंकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
Ranji trophy final 2022 : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ रणजी चषकाची फायनल मध्य प्रदेश विरुद्ध खेळत आहे. रणजी क्रिकेटच्या इतिहासात मुंबईने 47 व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला असून यावेळी नाणेफेकही मुंबईने जिंकली आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेणाऱ्या मुंबईची सुरुवात कर्णधार शॉ आणि यशस्वीच्या मदतीने चांगली झाली. पण नंतर मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत दोघांनाही बाद करत दिवसअखेर मुंबईचा निम्मा संघ तंबूत धाडला आहे. पहिल्या दिवसअखेर मुंबई 248 वर 5 बाद स्थितीत आहे.
असा पार पडला पहिल्या दिवशीचा खेळ
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. यावेळी सलामीला कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल आले. दोघांनी संघाला एक दमदार सुरुवात करुन दिली. पण पृथ्वी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना अनुभव अगरवालने त्याला 47 धावांवर बाद केलं. त्यानंतर यशस्वीने मात्र झुंज कायम ठेवली. नंतर अऱमान जाफर 26, सुवेद पारकर 18 धावांवर बाद झाले. त्यानंतर यशस्वीही 163 चेंडूत 78 धावा करुन तंबूत परतला. अनुभवनेच त्यालाही बाद केलं.
त्यानंतर हार्दिक टामोरेही 24 धावा करुन बाद झाला असून सध्या सरफराज खान 40 धावांवर भक्कम स्थितीत आहे. तर शम्स मुलीनीही 12 धावांवर खेळत आहे. मध्यप्रदेशकडून अनुभव अगरवाल आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी दोन तर कुमार कार्तिकेयने एक विकेट घेतली आहे.
उत्तरप्रदेशला मागे टाकत फायनलमध्ये मुंबई
मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मुंबईने 4 बाद 533 धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावाच्या आधारावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला.
हे देखील वाचा-