Rahul Dravid : नोव्हेंबरमधील त्या कॉलसाठी रोहितचे विशेष आभार, वर्ल्डकप विजयानंतर फेअरवलवेळी राहुल द्रविड भावूक
Rahul Dravid : राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेट संघासोबतचा प्रवास 29 जूनच्या टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलच्या दिवशी विजेतेपदानं पूर्ण झाला.
बारबाडोस : भारतीय क्रिकेट टीमची द वॉल अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मनात 2003 ची वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाची सल होतीच. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा प्रशिक्षक म्हणून काम करत असताना ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा 20 वर्षांनी झालेला पराभव मनाला लागणाराच होता. यानंतर राहुल द्रविडनं भारताच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) विनंतीला मान देत टीमसोबत काम करायला तयार झाल्याचं राहुल द्रविडनं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर संघासोबतचा प्रवास थांबवताना सांगितलं. राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या युवा शिलेदारांचं कौतुक देखील केलं.
भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह सर्व खेळाडूंचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. विजयाचा आनंद साजरा केल्यानंतर भारताचे खेळाडू, बीसीसीआयचे सचिव जय शाह हे ड्रेसिंग रुममध्ये जमले. इथं राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या युवा शिलेदारांसाठी प्रेरणादायी भाषण केलं.
राहुल द्रविड म्हणाले की, आताच्या क्षणाला मला शब्द कमी पडतायत. अप्रतिम आठवणींचा भाग बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वजण हे क्षण आठवणीत ठेवाल, रन किती काढल्या, विकेट किती काढल्या यापेक्षा तुम्ही हे क्षण आठवणीत ठेवाल. मला तुमचा अभिमान आहे, असं राहुल द्रविड भारताच्या खेळाडूंना म्हणाले.
मला तुमचा अभिमान आहे, तुम्ही ज्या प्रकारे कमबॅक केलं,आपण अनेकदा जवळ यायचो पण ती रेषा पार करु शकायचो नाही. पण यावेळी ते करुन दाखवलं, असं राहुल द्रविड म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
𝗧𝗵𝗲 𝘂𝗻𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁𝘁𝗮𝗯𝗹𝗲 𝗙𝗮𝗿𝗲-𝗪𝗔𝗟𝗟! 🫡
— BCCI (@BCCI) July 2, 2024
The sacrifices, the commitment, the comeback 🏆
📽️ #TeamIndia Head Coach Rahul Dravid's emotional dressing room speech in Barbados 👌👌 #T20WorldCup pic.twitter.com/vVUMfTZWbc
या संघानं जे सर्व लागेल ते दिलं, त्याग केला. संपूर्ण देशाला तुमच्यावर आणि तुम्ही मिळवलेल्या यशावर अभिमान आहे. काही जणांचे कुटुंब इथं आहेत, काही जणं घरी आहेत, सर्वांनी त्याग केला, लहाणपणापासून ते आतापर्यंत, तुमच्या पालकांनी, पत्नीनं आणि मुलं, भावंडं प्रशिक्षकांनी सर्वांनी त्याग केला, तुमच्यासोबत कठोर परिश्रम केलं, असं राहुल द्रविड म्हणाला. सर्वांनी दिलेल्या आदराबदद्ल आणि कोचिंग स्टाफला दिलेल्या प्रतिसादाबद्दल राहुल द्रविडनं आभार मानले.
रोहितच्या त्या कॉलची आठवण
राहुल द्रविडनं बोलताना कॅप्टन रोहित शर्माचा विशेष उल्लेख केला. रोहित शर्मा तुझे देखील आभार, नोव्हेंबरमधील कॉलसाठी आभार, पुन्हा सोबत काम करण्यासाठी रोहितनं विनंती केली होती, अशी आठवण द्रविड यांनी सांगितली.
मला वाटतं सर्वांसोबत काम करणं अभिमानास्पद आहे. कोच या नात्यानं कॅप्टन म्हणून काम करणाऱ्या रोहितसोबत काम करताना खूप वेळा चर्चा व्हायच्या, कधी सहमती कधी असहमती असायची, असंही द्रविड म्हणाले.
हा तुमचा क्षण आहे, हे टीमचं यश आहे, गेल्या महिनाभरात टीम म्हणून खेळलो, हे कुणा एकाचं यश नाही सर्वांचं आहे. बीसीसीआयच्या सर्वांचं देखील यश आहे, असं राहुल द्रविड म्हणाले.
संबंधित बातम्या :