IND W vs PAK W: पाकिस्तान चारीमुंड्या चीत, श्रेयंका पाटील, दिप्ती शर्माचा भेदक मारा, भारतापुढे फक्त 109 धावांचे माफक आव्हान!
India Women vs Pakistan Women : भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या महिला संघाने गुडघे टेकले आहेत. दिप्ती शर्मा आणि श्रेयंका पाटील यांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव 108 धावात गुंडाळला.
India Women vs Pakistan Women : महिला आशिया चषकामध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या महिला संघाने गुडघे टेकले आहेत. दिप्ती शर्मा आणि श्रेयंका पाटील यांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव 108 धावात गुंडाळला. पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. पाकिस्तानकडून सिदरा अमीन हिने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याशिवाय तुबा हसन आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी 22 धावांचे योगदान दिले. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
महिला आशिया कप 2024 च्या सामन्यात पाकिस्तानने भारताला फक्त 109 धावांचे आव्हान दिले होते. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तान संघाला पूर्ण 20 षटकेही फलंदाजी करु दिली नाही. भारताकडून दीप्ती शर्माने 3 विकेट घेतल्या. रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर आणि श्रेयंका पाटील यांनीही घातक गोलंदाजी केली. पाकिस्तानकडून फातिमा सनाने नाबाद 22 धावा केल्या. 16 चेंडूंचा सामना करताना त्याने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. तिने अखेरच्या दोन षटकांमध्ये विस्फोटक फलंदाजी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संघ अवघ्या 108 धावांवर गारद झाला. पाकिस्तान संघाला पूर्ण 20 षटकेही फलंदाजी करताना आली नाही. 19.2 षटकांत पाकिस्तानचा संघ ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून गुल फिरोजा आणि मुनिबा अली सलामीला आले. मुनिबाला 11 धावांवर पूजाने तंबूचा रस्ता दाखवला. तर फिरोजा वैयक्तिक 5 धावांवर बाद झाली. अमीन हिने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पण त्यासाठी 35 चेंडू घालवले. अमीन हिला रेणुकाने बाद केले. आलिया 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
टीम इंडियासाठी दीप्ती आणि रेणुका यांनी घातक गोलंदाजी केली. दीप्तीने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. रेणुकाने 4 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले. श्रेयंका पाटीलने 3.2 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. पूजाने 4 षटकात 31 धावा देत 2 बळी घेतले.
भारत-पाकिस्तान संघाची प्लेईंग 11
भारत: स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकुर सिंह
पाकिस्तान : सिदरा अमीन, गुल फ़िरोज़ा, मुनीबा अली (विकेटकीपर), निदा डार (कर्णधार), आलिया रियाज़, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इकबाल, नाशरा संधू, सैयदा अरूब शाह