Asia Cup 2023, PAK vs SL: श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, मेंडिस-असलंकाची धमाकेदार खेळी, पाकिस्तानचं आव्हान संपलं
Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत 252 धावांचा डोंगर रचला, पण श्रीलंकेनं धमाकेदार खेळीच्या जोरावर
Pakistan vs Sri Lanka Match Highlights: आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka) पाकिस्तानचा (Pakistan) 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी केवळ 42 षटकांत पूर्ण केलं. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसनं फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानंही 49 नाबाद धावा केल्या. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ टीम इंडियाविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत खेळणार आहे.
या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 8 धावा करायच्या होत्या, ज्यामध्ये पहिल्या 3 चेंडूत फक्त 2 धावा झाल्या होत्या. चौथ्या चेंडूवर श्रीलंकेनं आपली आठवी विकेट गमावली. आता श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 6 धावा करायच्या होत्या. असालंकानं पाचव्या चेंडूवर चौकार लगावला आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत संघाला अंतिम फेरीत नेलं.
कुसल परेराची विकेट गेली, निसांका अन् मेंडिसनं डावाची धुरा सांभाळली
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यात श्रीलंकेचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. कुसल परेरा मैदानात उतरताच पाकिस्तानच्या गोलंदाजांवर बरसू लागला. त्यानं वेगानं धावा करण्यास सुरुवात केली. पण पाकिस्ताननं परेराला माघारी धाडला. 20 धावा झाल्यानंतर 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात परेरा 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कुसल मेंडिसनं पथुम निसांकाला चांगली साथ दिली आणि पहिल्या 9 षटकांत संघासाठी भरघोस धावा केल्या. संघाला एकही धक्का बसू दिला नाही. दोन्ही खेळाडूंनी मिळून धावसंख्या 57 धावांपर्यंत नेली.
निसांका पॅव्हेलियनमध्ये परतली, मेंडिस आणि समरविक्रमामध्ये शतकी भागीदारी
पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या 9 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. दरम्यान, 77 धावांवर श्रीलंकेच्या संघाला दुसरा धक्का पथुम निसांकाच्या रूपानं बसला, जो 29 धावा करुन माघारी परतला. पाकिस्तानचा गोलंदाज शादाब खाननं निसांकाला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर कुसल मेंडिसला साथ देण्यासाठी सदिरा समरविक्रमा मैदानात उतरला. या दोघांनी मिळून पाकिस्तानवरचा दबाव वाढवला. संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मेंडिस आणि समरविक्रमा दोघांनी धमाकेदार खेळी केली.
तिसऱ्या विकेटसाठी सदिरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांच्यात 100 धावांची उत्कृष्ट भागीदारी पाहायला मिळाली. 177 धावांवर समरविक्रमाच्या रूपात श्रीलंकेच्या संघानं तिसरी विकेट गमावली, समरविक्रमा इफ्तिखार अहमदच्या जाळ्यात अडकला आणि 48 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.
कुसल मेंडिस निर्णायक वेळी झाला बाद, असालंका ठरला श्रीलंकेसाठी संकटमोचक
कुसल मेंडिस श्रीलंकेला विजयाच्या दिशेनं नेण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत होता. पण अगदी महत्त्वाच्या क्षणी त्याला आपल्या जाळ्यात ओढण्यात पाकिस्तानला यश आलं. 91 धावांवर मेंडिस बाद झाला आणि माघारी परतला. यानंतर श्रीलंकेनं 222 धावांवर कर्णधार दासुन शनाकाला माघारी धाडलं. हा श्रीलंकेचा 5 वा विकेट होता. त्यानंतर असलंकानं धुरा आपल्या खांद्यावर पेलली. चरित असलंकानं 49 धावांची नाबाद खेळी खेळली. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदनं 3 आणि शाहीन आफ्रिदीनं 2 विकेट्स घेतले.
रिझवानच्या शानदार फलंदाजीसह पाकिस्तानच्या 252 धावा
पाकिस्तानकडून या सामन्यात मोहम्मद रिझवानने 73 चेंडूत 86 धावांची शानदार नाबाद खेळी खेळी केली. याशिवाय शफीकने 52 धावांची तर इफ्तिखारने 47 धावा करत संघासाठी मोलाचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून दमदार गोलंदाजी करत महिशा पाथिरानाने तीन तर मदुशनने दोन बळी घेतले. आता श्रीलंकेला डीएल पद्धतीने 42 षटकांत 252 धावांचे आव्हान आहे.