Wankhede Stadium : सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण, अनेक दिग्गज राहणार उपस्थित
Wankhede Stadium : भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत.
Sachin Tendulkar Life Size Statue : भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. विक्रमांच्या राशी रचणाऱ्या या महान खेळाडूकडून कायम नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज, बुधवार 1 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना दोन नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. त्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्तित राहणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर या सोहळ्याला अनेक नेत्यांसह माजी खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
ऑस्ट्रेलियन दिग्गज दिवंगत फिरकीपट्टू शेन वॉर्नच्या चेंडूवर षटकार मारणारा सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा 22 फुटांचा पुतळा प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद काळे यांनी तयार केला आहे. आजपासून हा पुतळा सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे. या अनावरण कार्यक्रमाला राजकीय नेत्यांसह क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूही उपस्थित राहणार आहेत. नवीन खेळाडूंना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात येत आहे.
A life-size statue honouring Sachin Tendulkar will be unveiled on Wednesday on the eve of the World Cup match between India and Sri Lanka at Mumbai's Wankhede Stadium.#CWC23 #INDvSL pic.twitter.com/Mdtwy6tCbl
— Circle of Cricket (@circleofcricket) October 31, 2023
वानखेडे स्टेडियमच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होईल.या सोहळ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित असतील. या सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित राहणार आहे. सचिन आणि वानखेडे यांचे नाते खूप जुने आहे. या स्टेडियमवर त्याने धावांच्या राशी उभारल्या आहेत. भारताने 2011 मध्ये याच ठिकाणी विश्वचषक उंचावला. त्यामुळे सचिनच्या पुतळय़ासाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असेल, अशी प्रतिक्रिया मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली.
करिअरमधील शेवटची कसोटी इथेच -
2013 मध्ये सचिन तेंडुलकर याने वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट करिअरमधील अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. वानखेडे मैदानावरच 2011 साली वन डे मधील दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. सचिनला त्यावेळी खेळाडूंनी खांद्यावर घेत संपूर्ण मैदानात फेरी मारली होती. सचिन तेंडुलकरने दोन दशाकांहून अधिक काळ क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. त्याला क्रिकेटचा देव म्हणूनही ओळखले जाते. सचिन तेंडुलकरने वनडे आणि कसोटीमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करण्याचा पराक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये 18 हजारांपेक्षा जास्त धावा काढल्यात. तर कसोटीत 15921 धावा नावावर आहेत.