Asia cup 2022: आशिया चषकातील धोनी, रैनाचा तो खास विक्रम आजही अबाधित!
Asia cup 2022: आशिया चषकाला येत्या शनिवारपासून (27 ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तान आमने सामने येणार आहेत.
Asia cup 2022: आशिया चषकाला येत्या शनिवारपासून (27 ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AGF) आमने सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत या स्पर्धेतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना 28 ऑगस्ट 2022 रोजी खेळला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, आशिया चषकातील पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैनानं (Suresh Raina) आशिया चषकातील पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होतं.
आशिया चषकात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलंय. मात्र या स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात केवळ दोनच भारतीयांना शतक झळकावता आलं आहे. माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं हा पराक्रम केला आहे. आशिया चषकात त्यानं नाबाद 109 धावांची खेळी केली. त्यानंतर सुरेश रैनाला अशी कामगिरी करता आली आहे. त्यानंही आशिया चषकातील पदार्पणाच्या सामन्यात 101 धावांची खेळी केली होती.
विराट कोहलीच्या प्रदर्शानावर सर्वांची नजर
आशिया चषकात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध नेहमीच दमदार कामगिरी करून दाखवलीय. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे पाकिस्तानविरुद्धचे आकडे चांगाले आहेत. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. आशिया चषकात विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध तीन वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. कोहलीनं 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची दमदार खेळी केली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आहे.
अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येण्याची शक्यता
आशिया चषकात भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगशी होईल. आशिया चषकातील अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. यापूर्वी सुपर 4 चे सामने खेळले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच दिवसांनी सामना रंगणार आहे. यामुळं या स्पर्धेत दोन्ही अंतिम फेरीत आमने सामने यावेत, अशी दोन्ही देशातील चाहत्यांची इच्छा आहे.
हे देखील वाचा-