मोहम्मद शामीला अटक करू नका; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती, पण नेमकं घडलंय काय?
Mohammed Shami News: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या विजयात मोहम्मद शामीनं महत्त्वाचं योगदान दिलेलं. त्यानं 7 विकेट्स घेत सामन्याचं चित्रच पालटलं.
India Vs New Zealand: यंदा देशात वर्ल्डकपचा (ICC World Cup 2023) सोहळा रंगला आहे. अशातच टीम इंडिया (Team India) यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) धडाकेबाज कामगिरी करत आहे. आतापर्यंत वर्ल्डकप 2023 मध्ये खेळवण्यात आलेल्या सर्वच्या सर्व सामन्यांत टीम इंडियानं विजय मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) सेमी फायनलच्या सामन्यातही टीम इंडियानं धडाकेबाज कामगिरी करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत टीम इंडियानं फायनलमध्ये थाटात प्रवेश मिळवला. या विजयासाठी जितकी विराट कोहली (Virat Kohali) आणि श्रेयस अय्यरच्या शतकांची चर्चा होत आहे, तितकीच चर्चा मोहम्मद शामीच्या (Mohammed Shami) घातक गोलंदाजीचीही होत आहे. एकीकडे मोहम्मद शामीवर कौतुकाचा वर्षाव थांबण्यात नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे शामीबाबत दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करुन केलेल्या एका ट्वीटच्या चर्चा जोरदार सुरू आहे.
मोहम्मद शामीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट घेत किवी संघाचा धुव्वा उडवला. सामन्यात एक वेळी अशी आली की, आता काही खरं नाही, टीम इंडियाचं वर्ल्डकप उंचावण्याचं स्वप्न अधुरंच राहील असं वाटत होतं , मात्र शामीनं बॉल हातात घेतला आणि न्यूझीलंडवर तुटून पडला. शामीमुळेच टीम इंडियानं सामन्यात पुनरागमन केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचवेळी, दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी मोहम्मद शामीच्या गोलंदाजीबाबत ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना उद्देशून दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे की, मोहम्मद शामीला अटक करू नका. या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मोहम्मद शामीला अटक करू नका; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती
दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करुन एक ट्वीट केलंय. त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना मोहम्मद शामीला अटक करू नका, असं म्हटलं आहे. मोहम्मद शामीनं सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिल्ली पोलिसांनी हे गंमतीशीर ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो की, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शामीला अटक करणार नाही." याला उत्तर देताना मुंबई पोलिसांनीही एक गंमतीशीर ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही."
You missed pressing charges of stealing innumerable hearts @DelhiPolice and listing a couple of co-accused too😂
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) November 15, 2023
P.S.: Dear citizens, both the departments know the IPC thoroughly and trust you for a great sense of humour 😊 https://t.co/TDnqHuvTZj
मोहम्मद शामीनं उडवला किवी संघाचा धुव्वा
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून टीम इंडियानं सर्वात आधी फलंदाजी करत 397 धावांची मोठी धावसंख्या उभारली. विराट कोहलीनं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वं शतक झळकावलं आणि अशा प्रकारे तो क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज बनला. त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. श्रेयस अय्यरनंही 70 चेंडूत 105 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर भारतीय गोलंदाज खेळपट्टीवर आले तेव्हा त्यांनीही धुमाकूळ घातला.
शामीनं सर्वात आधी न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी धुवाधार फलंदाजी करत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं. पण शामी किवी संघावर तुटून पडला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये विल्यमसनची विकेट घेतली. यानंतर मात्र शामीच्या अंगात जणू वादळच संचारलं होतं. एक एक करून चक्क सात विकेट्स चटकावल्या. किवी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.