Mayank Agarwal : KL राहुलची माघार, मयंक अग्रवालच्या हाती कर्णधारपदाची धुरा! चॅम्पियन संघात कोणत्या 16 खेळाडूंना मिळाला संधी?
23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्धच्या एलिट ग्रुप सी सामन्यासाठी कर्नाटकने आपला संघ जाहीर केला आहे.
Karnataka Squad for Ranji Trophy : 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्धच्या एलिट ग्रुप सी सामन्यासाठी कर्नाटकने आपला संघ जाहीर केला आहे. मयंक अग्रवालकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या विजयात 18 विकेट्स घेऊन शानदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस गोपाळला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या सामन्यात केएल राहुल खेळणार असल्याची चर्चा होती, पण त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. केएल राहुलला कोपराच्या दुखापतीचा त्रास आहे. यामुळे, तो कर्नाटकच्या पुढील फेरीतील पंजाबविरुद्ध बंगळुरूमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. केएल राहुलने मार्च 2020 मध्ये कर्नाटककडून बंगालविरुद्ध शेवटचा रणजी सामना खेळला होता. पण, इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
बीसीसीआयने गुरुवारी टीम इंडियासाठी नवीन धोरणे जाहीर केली. यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय संघ आणि केंद्रीय करारांमध्ये निवडीसाठी पात्र राहण्यासाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य झाले आहे. केवळ काही विशिष्ट परिस्थितीत खेळाडूला यातून सूट दिली जाईल. नवीन धोरणात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय संघ आणि केंद्रीय करारात निवडीसाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग अनिवार्य आहे. यामुळे खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटशी जोडलेले राहण्यास आणि सामन्यातील फिटनेस राखण्यास मदत होईल.
🚨 Karnataka’s Squad for #RanjiTrophy match against Punjab 🔽
— Deepanshu Thakur (@realdpthakur17) January 20, 2025
Mayank Agarwal (Captain), Shreyas Gopal, Devdutt Padikkal, K.V. Aneesh, R. Smaran, K.L. Shrijith, Abhinav Manohar, Hardik Raj, Prasidh Krishna, V. Koushik, Abhilash Shetty, Yashovardhan Parantap, Nikin Jose, Vidyadhar… pic.twitter.com/dOXviiuf0G
संघात 16 खेळाडूंना मिळाली संधी
कर्नाटक संघात 16 खेळाडूंना संधी मिळाली आहे आणि त्यांचे नेतृत्व मयंक अग्रवाल करणार आहे. ज्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि अव्वल क्रमांकाचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याचाही समावेश आहे. पडिक्कलने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीच्या तीन सामन्यांमध्ये एक अर्धशतक आणि एक शतक झळकावले. हे दोन्ही खेळाडू अलिकडेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले होते.
मयंक अग्रवालने 2022 मध्ये खेळला होता शेवटचा कसोटी सामना
दुसरीकडे, मयंक अग्रवाल बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघाबाहेर आहे. त्याने 2022 मध्ये भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतासाठी 21 कसोटी सामन्यांमध्ये 1488 धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 5 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. आता तो रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये आपले स्थान पुन्हा मिळवू इच्छितो.
कर्नाटक संघ :
मयंक अग्रवाल (कर्णधार), श्रेयस गोपाळ (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, के.वी अनीश, आर स्मरन, केएल श्रीजित (यष्टीरक्षक), अभिनव मनोहर, हार्दिक राज, प्रसिद्ध कृष्णा, वासुकी कौशिक, अभिलाष शेट्टी, यशोवर्धन परंतप, निक्किन जोस, विद्याधर पाटील, सुजय साठेरी (यष्टीरक्षक), मोहसीन खान.