IND vs SL 2nd T20 Weather Report: भारत-श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती आणि पिच रिपोर्ट?
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी20 सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.
India vs Sri Lanka 2nd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना आज 5 जानेवारीला होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरणार आहे. दुसरीकडे, मालिकेत टिकण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. पुण्यात दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दरम्यान या महत्त्वाच्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 मध्ये पाऊस व्यत्यय आणणार का? हे जाणून घेण्यासाठी सामना होणाऱ्या ठिकाणचं हवामान आणि खेळपट्टीबाबत जाणून घेऊ...
हवामान परिस्थिती
हवामान खात्यानुसार, 5 जानेवारी रोजी पुणे शहराचे तापमान दिवसभरात 31 अंश सेल्सिअस राहील. त्याच वेळी, रात्रीच्या वेळेत हवामानात घट होईल आणि पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. या दरम्यान दिवसा आणि रात्री आकाश साफ असणार आहे. दिवसा फक्त 5 टक्के आणि रात्री ही 5 टक्के इतकीच पाऊसाची शक्यता आहे. म्हणजेच भारत-श्रीलंका सामन्यात पावसाचा अडथळा येणार नाही. त्याचप्रमाणे दिवसभरात हवामानात आर्द्रता 53 टक्के राहील. मात्र रात्री ते 62 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे खेळाडूंना सामन्यादरम्यान आर्द्रतेचा सामना करावा लागू शकतो.
कसा आहे पिच रिपोर्ट?
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 153 धावा इतकी आहे. तर दुसऱ्या डावात 128 धावा झाल्या आहेत. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारायची आहे. तसे, पुण्यात आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले गेले आहेत. 2020 मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 6 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या.
कधी, कुठे पाहाल सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार 7 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा