IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी किंग कोहली सज्ज, नागपुराच्या मैदानात विराटचा रेकॉर्ड दमदार
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील सलामीचा सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानात रंगणार आहे.
![IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी किंग कोहली सज्ज, नागपुराच्या मैदानात विराटचा रेकॉर्ड दमदार Know virat kohlis record in nagpur Cricket stadium before india vs Australia 1st test at nagpur IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी किंग कोहली सज्ज, नागपुराच्या मैदानात विराटचा रेकॉर्ड दमदार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/4da3641aebe06465e266a5462b74a0ea_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात होणाऱ्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत दोन्ही संघाच्या खेळाडूंवर सर्वाचं लक्ष असणार आहे. अशामध्ये एका खेळाडूच्या कामगिरीवर सर्वात जास्त क्रिकेटरसिकांचं लक्ष असेल आणि तो खेळाडू म्हणजे माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी फॉर्मेटमध्ये कोहलीने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. पण कसोटी फॉरमॅटमध्ये कोहलीला 2019 सालापासून एकही शतकी खेळी खेळता आलेली नाही. विशेष म्हणजे विराट कोहलीची गेल्या दोन कसोटी मालिकांतील कामगिरी पाहिली, तर तो 50 धावांचा आकडाही पार करू शकलेला नाही. पण आता मागील काही काळापासून तो फॉर्मात परतल्याने या कसोटी मालिकेतही शतक ठोकेल अशी आशा आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा रेकॉर्ड पाहिला, तर तो आतापर्यंत खूप काही पाहायला मिळालं आहे. कोहलीने याठिकाणी तीन सामन्यांत 88.50 च्या प्रभावी सरासरीने 354 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतकी खेळीही पाहायला मिळाली, ज्यामध्ये कोहलीने एका डावात 213 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कसोटी फॉरमॅटमध्ये विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्डही शानदार आहे. कोहलीने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 48.06 च्या सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 7 शतकं आणि 5 अर्धशतकांची खेळीही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे.
नॅथन लियॉन कोहलीसाठी मोठा धोका
या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघही खूप मजबूत दिसत आहे, ज्यामध्ये नॅथन लियॉनच्या रूपाने एक अनुभवी ऑफस्पिनर त्यांच्याकडे आहे. लियॉन विराट कोहलीसाठी मोठा धोका बनू शकतो कारण त्याने आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये लियॉनच्या गोलंदाजीविरुद्ध 7 वेळा विकेट गमावली आहे, ज्यामध्ये लियॉनने कोहलीला 4 वेळा झेलबाद केलं आहे तर 3 वेळा एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे.
73 शतकं केली पूर्ण
विराट कोहलीनं नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज खेळी केली. या सामन्यात त्याने 110 चेंडूत 166* धावा केल्या. त्यानं हे शतक ठोकत आपली 73 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली असून त्याचं हे 46 व एकदिवसीय शतक होतं. त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.91 होता. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतकं झळकावली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)