Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Jay Shah: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची (GC) आज बंगळुरू येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी आयपीएल हंगामाबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Jay Shah: मुंबई : सध्या महाराष्ट्रातील जनतेला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे, विधानसभेचा मोठा इव्हेंट झाल्यानंतर पुढच्यावर्षी आयपीएलचा हंगाम येत आहे. आयपीएल 2025 चा हंगाम अजून दूर आहे, पण संघांनी तयारी सुरू केली आहे. याबाबत बीसीसीआयकडून लवकरच रिटेनशन पॉलिसी जारी करण्यात येणार आहे. आयपीएलचा (IPL) सध्याचा चॅम्पियन संघ केकेआर म्हणजेच कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या नवीन मार्गदर्शकाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक ड्वेन ब्राव्हो आता त्यांचा नवा मार्गदर्शक असणार आहे. एकीकडे संघांकडून तयारी सुरू असतानाच आता बीसीसीआय देखील तयारीला लागली असून बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी आयपीएलच्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता प्रत्येक सामन्यांसाठी आयपीएल खेळाडूंना पैसे मिळणार आहेत.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची (GC) आज बंगळुरू येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी आयपीएल हंगामाबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सहा सदस्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ, बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार आहेत. विशेष म्हणजे बीसीसीआयची वार्षिक बैठक देखील उद्या 29 सप्टेंबर रोजी फोर सीझन होटेलमध्ये होत आहे. ज्यामध्ये भारतीय क्रिकेटमधील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहतील. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर बीसीसीय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.
IPL हंगामांचे सातत्य टिकवण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही आमच्या क्रिकेटपटूंसाठी मानधनात वाढ करत असल्याचं जय शाह यांनी म्हटलं. त्यानुसार, आता आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटर्संना प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, आयपीएलच्या एका हंगामात सर्व साखळी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1 कोटी 05 लाख रुपये बोनसही मिळेल. त्यामुळे, आयपीएल क्रिकेटर्स आणखी मालामाल होणार आहेत.
जय शाह यांनी प्रत्येक फ्रँचायझीला एका हंगामासाठी मॅच फी म्हणून 12.60 कोटी रुपये देण्यात येतील, अशीही घोषणा आपल्या ट्विटरवरुन केली आहे. IPL आणि खेळाडूंसाठी हे एक नवीन युग आहे, असे म्हणत जय शाह यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली आहे. त्यामुळे, अगोदरच कोट्यवधींची बोली लागून कोट्याधीश झालेल्या आयपीएल खेळाडूंवर आणखी पैशांचा पाऊस पडणार आहे.
In a historic move to celebrate consistency and champion outstanding performances in the #IPL, we are thrilled to introduce a match fee of INR 7.5 lakhs per game for our cricketers! A cricketer playing all league matches in a season will get Rs. 1.05 crores in addition to his…
— Jay Shah (@JayShah) September 28, 2024