IND vs AUS 1st ODI: हार्दिक पांड्यासाठी एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व करणं सोपं नाही, जाणून घ्या काय आहे कारण?
Hardik Pandya : मुंबईतील वानखेडे येथे 17 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार असेल. तो प्रथमच भारतीय संघाच्या वनडे संघाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
IND vs AUS, ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे अनुपस्थित असेल, अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या भारताच्या वनडे संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान आतापर्यंत हार्दिक पांड्याचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधारपदाचा रेकॉर्ड चांगला आहे, परंतु आता तो प्रथमच एकदिवसीय संघाची जबाबदारी स्वीकारणार आहे, त्यामुळे हे आव्हान त्याच्यासाठी सोपं नसेल.
IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्याने आपल्या संघाला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवले. त्यानंतर लगेचच, जून 2022 मध्ये, त्याला आयर्लंड दौऱ्यावर भारताच्या T20 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून पांड्याने 11 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून यापैकी टीम इंडियाने 8 जिंकले आहेत. म्हणजेच टी-20 क्रिकेटमध्ये पांड्याचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड वाखाणण्याजोगा आहे. पण एकदिवसीय फॉरमॅट पूर्णपणे वेगळा असल्यान त्याच्यासमोर नक्कीच काही आव्हानं असतील...
वनडेत हार्दिकसमोर कोणती आव्हानं असतील?
- 20 ओव्हर आणि 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये खूप फरक आहे. पांड्या स्वत: वनडेपेक्षा टी-20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून अधिक यशस्वी ठरला आहे. तो भारताच्या एकदिवसीय संघाचा नियमित भागही नाही. अशा स्थितीत एकदिवसीय संघात अष्टपैलू म्हणून तंदुरुस्त होण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल.
- कर्णधार म्हणून हार्दिकचे दुसरे मोठे आव्हान टीम इंडियाची प्लेईंग-11 निवडण्याचे असेल. टीम इंडियासाठी 17 पैकी 11 खेळाडूंची निवड करणे हार्दिकसाठी सोपे नसेल. तो केएल राहुलला त्याच्या प्लेईंग-11 चा भाग बनवणार का, हाही मोठा प्रश्न असेल. फिरकी गोलंदाजीतील अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची निवडही गुंतागुंतीची होणार आहे. त्याच्याकडे वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेलसारखे पर्याय आहेत. त्यानंतर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवही येथे फिरकीपटू म्हणून उपलब्ध असतील. अशा स्थितीत या पाचपैकी दोन किंवा तिघांची निवड करणे हार्दिकसाठी सोपे जाणार नाही.
- हार्दिकसाठी तिसरे मोठे आव्हान विरोधी संघ ऑस्ट्रेलियाचे असेल. हार्दिकने आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये ज्या संघांचे नेतृत्व केले आहे, ते सर्व संघ ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमकुवत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात एकापेक्षा एक अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांचा सामना करणे सोपे नाही. फलंदाजीमध्ये हार्दिकला डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, मॅक्सवेल आणि स्टॉइनिससारख्या खेळाडूंना रोखण्यासाठी विशेष रणनीती तयार करावी लागेल. त्याचबरोबर मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा या खेळाडूंनाही गोलंदाजीत तोंड द्यावे लागणार आहे.
- हार्दिकच्या समोर एक उत्तम कर्णधारही असेल, ज्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. खरं तर, पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत, स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे, ज्याने यापूर्वी 51 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाला अनपेक्षित विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-