Ishan Kishan : इशान किशनचा उतरला माज! टीम इंडियात येण्यासाठी असेल आता शेवटची संधी; 'या' संघाचे करणार नेतृत्व
इशान किशन आता सध्या भारतीय संघाबाहेर असून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी आणि टी-20 संघात त्याला स्थान मिळालेले नाही.
Ishan Kishan Jharkhand Captain In Ranji Trophy : इशान किशन आता सध्या भारतीय संघाबाहेर असून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी आणि टी-20 संघात त्याला स्थान मिळालेले नाही. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचाच भारतीय संघात समावेश होईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आता इशान किशन झारखंड रणजी संघात परतला असून त्याला झारखंड संघाचा कर्णधारही बनवण्यात आले आहे.
बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले
इशान किशनला गेल्या मोसमात संघातून बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतच्या अपघातानंतर भारताच्या पांढऱ्या चेंडू संघात नियमित झालेल्या इशानने गेल्या वर्षी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ब्रेक घेतला होता. विश्रांतीनंतर तो बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकृत सामन्यात सहभागी झाला नाही. त्याने भारतासाठी शेवटचा सामना 2023 साली खेळला गेला होता.
आयपीएलमध्ये केले पुनरागमन
त्यानंतर हा 26 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज आयपीएलपूर्वी खाजगीरित्या आयोजित डीवाय पाटील टी-20 चषकात खेळला. यामुळे फ्रँचायझी क्रिकेट आणि राज्य बांधिलकी यांच्यातील संतुलनाबाबत वाद सुरू झाला. मात्र, इशानने देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीने बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतले. गेल्या महिन्यात त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये भारत क संघाकडून शतक झळकावले होते. त्यानंतर इराणी चषकात शेष भारताकडून एकमेव डावात त्याने 38 धावा केल्या. आता तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे आणि महत्त्वाच्या प्रसंगी धावाही करत आहे.
युवा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज
आता 16 सदस्यीय झारखंड संघाचा कर्णधार म्हणून इशान किशन युवा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. गेल्या मोसमाचा कर्णधार विराट सिंग उपकर्णधार तर कुमार कुशाग्र यष्टिरक्षक असेल. झारखंड आपल्या रणजी करंडक स्पर्धेची सुरुवात एलिट गट ड मध्ये आसामविरुद्ध गुवाहाटी येथे करणार आहे. गेल्या मोसमात झारखंड अ गटात तळापासून तिसऱ्या स्थानावर होता. त्यांनी सातपैकी दोन सामने जिंकले, दोन गमावले आणि तीन सामने अनिर्णित राहिले.
झारखंडच्या निवड समितीचे अध्यक्ष सुब्रतो दास यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, इशान हा अनुभवी खेळाडू असून त्याला आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. आम्ही युवा संघ निवडला आहे. सौरभ तिवारी, शाहबाज नदीम आणि वरुण आरोन हे सर्व गेल्या मोसमानंतर निवृत्त झाले त्यामुळे आम्हाला आमच्या रणनीतीवर पुनर्विचार करावा लागला.
झारखंड क्रिकेट संघ : इशान किशन (कर्णधार), विराट सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), नाझिम सिद्दीकी, आर्यमन सेन, शरणदीप सिंग, कुमार सूरज, अनुकुल रॉय, उत्कर्ष सिंग, सुप्रियो चक्रवर्ती, सौरभ शेखर, विकास कुमार, विवेकानंद तिवारी, मनिषी, रवी कुमार यादव आणि रौनक कुमार.