IPL 2022 : आयपीएल 2022 चा थरार भारतातच ; BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
आयपीएल 2022 चे आयोजन दुबई किंवा इतर कोणत्याही देशात केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, ही स्पर्धा देशात खेळवली जाणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एबीपी न्यूजला सांगितले.
IPL 2022 : आयपीएल 2022 चा थरार भारतातच पार पडणार आहे. परंतु, हे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे आयपीएलचे आयोजन दुबई किंवा इतर कोणत्याही देशात केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, ही स्पर्धा देशात खेळवली जाणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एबीपी न्यूजला सांगितले.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने नुकतेच सांगितले होते की, आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी आयपीएलचा टायटल स्पॉन्सर 'टाटा' ग्रुप असेल. यावेळी 1200 हून अधिक खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली असून त्यात 300 हून अधिक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या मते, पुढील हंगामासाठी सुमारे 217 खेळाडू खरेदी केले जातील, त्यापैकी 70 परदेशी खेळाडू असतील.
आयपीएलचा आगामी सीझन अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण यंदा 8 ऐवजी 10 संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. लखनौ आणि अहमदाबादचे संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या वेळी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यावेळीही ट्रॉफीसाठी रोमांचक लढत होणार आहे.
लखनौ संघाने ड्राफ्टमधून सलामीवीर केएल राहुल, अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि फिरकीपटू रवी बिश्नोई यांची निवड केली आहे. केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णयही जवळपास निश्चित झाला आहे. याशिवाय अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकीपटू रशीद खान आणि युवा फलंदाज शुभमन गिल यांचा ड्राफ्टमधून समावेश केला आहे. याशिवाय संघाने हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही संघ पुढील हंगामात आकर्षणाचे केंद्र असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: आयपीएल नको! 'या' स्टार खेळाडूंनी लिलावातून घेतली माघार
- INDvsPAK : 23 ऑक्टोबरला मौका, मौका... क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना, टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार
- ICC T20 World Cup 2022 : आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा