U-19 World Cup 2024 : युवा ब्रिगेडकडून विश्वचषकाची विजयी सुरुवात, बांगलादेशला 84 धावांनी लोळवलं!
IND vs BAN Match Report : अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या युवा ब्रिगेडने विजयाने सुरुवात केली आहे. आज झालेल्या सामन्यात भारताच्या युवा संघाने बांगलादेशचा दारुण पराभव करत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली.
IND vs BAN Match Report : अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या युवा ब्रिगेडने विजयाने सुरुवात केली आहे. आज झालेल्या सामन्यात भारताच्या युवा संघाने बांगलादेशचा दारुण पराभव करत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. भारताने बांगलादेश संघासमोर विजयासाठी 252 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पण भारताच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा संघ 45.5 षटकात 167 धावांत गारद झाला. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. बांगलादेशकडून मोहम्मद शिहाब जेम्स याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 77 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय अरिफुल इस्लाम याने 71 चेंडूत 41 धावा जोडल्या. बांगलादेशच्या इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून सौप्य पांडे याने भेदक मारा केला. त्याने 9.5 षटकात अवघ्या 24 धावा खर्च करत चार फलंदाजांना तंबूत पाठवले. मुशीर खान याने दोन विकेट घेतल्या. राज लिंबानी, अर्शिन कुलकर्नी आणि प्रियांशु मोलिया यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
भारतानने 251 धावांपर्यंत मजल मारली
बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 50 षटकात सात विकेट्सच्या मोबदल्यात 251 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून आदर्श सिंह याने सर्वाधिक धावा चोपल्या. आदर्श सिंह याने 96 चेंडूमध्ये 76 धावा केल्या. त्याने आपल्या डावात सहा चौकार लगावले. त्याशिवाय भारताचा कर्णधार उदय सहारन याने 94 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने 64 धावांचे योगदान दिले. विकेटकिपर अरवली अवनीश आणि सचिन दास यांनी अखेरच्या षटकात झटपट धावा केल्या. अरवली अवनीश याने 17 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. तर सचिन दास याने 26 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. भारताच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.बांगलादेशकडून मारुफ मृधा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने भारताच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याशिवाय चौधरी मोहम्मद रिजवान आणि महफुजर रहमान राबी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
Congratulations to Team India U19 for winning against Bangladesh U19 by 84 runs in the ICC U19 World Cup, marking the beginning of their campaign with an impressive start. Saumy Pandey taking four wickets was a standout moment in this impressive triumph. pic.twitter.com/NoUPo9TyRK
— Jay Shah (@JayShah) January 20, 2024
भारताच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल -
भारताच्या युवा संघाने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. आयर्लंड संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. भारत आणि आयर्लंड संघाचे प्रत्येकी दोन दोन गुण आहेत. पण आयर्लंडचा रनरेट चांगला असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आहेत. आता भारतीय संघाचा पुढील सामना 25 जानेवारी रोजी आयर्लंडच्या विरोधात आहे. या सामन्यात जिंकणारा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान होईल. भारतीय संघ 28 जानेवारी रोजी अमोरिकाविरोधात मैदानात उतरेल.