(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ZIM : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! वर्षात दोन वेळा 10 विकेट्सच्या फरकाने मिळवला विजय
India vs Zimbabwe : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने तब्बल 10 विकेट्सनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
Team India Record : भारतीय क्रिकेट संघ सध्या कमाल फॉर्मात असून मर्यादीत षटकांच्या सामन्यात एक-एका संघाला मात देताना दिसत आहे. नुकतंच इंग्लंड, वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत जाऊन मात दिल्यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्धही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने तब्बल 10 विकेट्सनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे हा सामना 10 विकेट्सने जिंकत भारताने एक खास रेकॉर्ड केला आहे. भारताने एकाच वर्षात दोनदा 10 विकेट्सच्या फरकाने विजय मिळवण्याची कामगिरी यंदा केली आहे. आज झिम्बाब्वेला मात देण्याआधी 12 जुलै रोजी भारताने इंग्लंडला एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून मात दिली होती.
इंग्लंडला नुकतीच दिली होती मात
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात जुलैमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. सामन्यात आधी भारताने भेदक अशी गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं. ज्यानंतर 111 धावांचं लक्ष्य केवळ 18.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केलं. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताच्या वेगवान सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली आणि अवघ्या 110 धावांत इंग्लंडला रोखलं. यावेळी बुमराहने अप्रतिम अशी 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या. 111 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलााग करताना भारताने सुरुवातीपासून संयमी पण दमदार फलंदाजी कायम ठेवली. भारताची सर्वात अनुभवी जोडी रोहित-शिखर मैदानात असल्याने विजय मिळवणं आणखी सोपा झाला. रोहितने एका बाजूने फटकेबाजी करत शिखरने संयमी फलंदाजी केली. रोहितने 58 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर शिखरने 54 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि केवळ 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता विजय मिळवला.
झिम्बाब्वेविरुद्ध असा मिळवला विजय
भारताने सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या तदीवांशे मरुमानी, इनोसंट काया यांना बाद करून दीपक चहरनं झिम्बाब्वेच्या संघाला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर झिम्बाब्वे संघानं सातत्यानं विकेट्स गमावली. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगीज चकाब्वानं सर्वाधिक 35 धावांची खेळी. रेगीज चकाब्वानंतर रिचर्ड येनगारावा (33 धावा) आणि ब्रॅडली इवांसनं (नाबाद 34 धावा) अखेरिस फटकेबाजी केली. ज्यामुळं झिम्बाब्वेच्या संघाला 40.3 षटकात 189 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, फिरकीपटू अक्षर पटेलच्या खात्यातही तीन विकेट्स जमा झाल्या. याशिवाय, मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली.
त्यानंतर 190 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून सलामीवीर शुभमन आणि शिखर या दोघांनी अगदी अप्रतिम अशी सुरुवात भारताला करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच अगदी उत्तम फलंदाजी करत भारताला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. शुभमनने 72 चेंडूत नाबाद 82 तर शिखरने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. ज्यामुळे 30.5 षटकातच भारताने 192 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली.
हे देखील वाचा-