IND vs BAN : भारतापुढे बांगलादेशी टायगर झाले होते ढेर, अवघ्या 76 धावांत खुर्दा, युवराजचे शतक, झहीरच्या चार विकेट
World Cup 2023 : टीम इंडियाने विश्वचषकात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे.
World Cup 2023 India vs Bangladesh : टीम इंडियाने विश्वचषकात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. लागोपाठ तीन सामन्यात विजय मिळवत भारताने सेमीफायनलच्या दिशेने पाऊल टाकले आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या संघाचा पराभव केला आहे. आता गुरुवारी बांगलादेशविरोधात टीम इंडियाची लढत आहे. पुण्यात होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. 2003 मध्ये भारताने बांगलादेशचा 200 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात युवराज सिंह याने नाबाद शतक ठोकले होते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कोणताही लढत असेल, तर तो सामना आठवणीत येतोच.
युवराजचे वादळी शतक, वीरुचे झंझावती अर्धशतक -
एप्रिल 2003 मध्ये टीव्हीएस चषक खेळवण्यात आला होता. यातील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ढाका येथे झाला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 276 धावा केल्या होत्या. यामध्ये युवराज सिंह याने 85 चेंडूमध्ये नाबाद 102 धावा चोपल्या होत्या. यामध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सलामी फलंदाज वीरेंद्र सहवाग यानेही शानदार खेळी केली होती. सहवागने 51 चेंडूमध्ये 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 63 धावांचा पाऊस पाडला होता.
झहीर-अजित अगरकरची भेदक गोलंदाजी -
भारताने दिलेल्या 277 धावांच्या विराट आव्हानापुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी लोटांगण घेतले होते. भारताच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले होते. भारताच्या गोलंदाजांपुढे बांगलदेशचा संघ फक्त 76 धावांपर्यंत मजल मारु शकला. बांगलादेशकडून मोहम्मद रफीक याने सर्वाधिक 18 धावांची खेळी केली होती. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. भारताकडून झहीर खान याने भेदक मारा केला होता. झहीर खान याने 7.3 षटकात 19 धावांच्या मोबदल्यात बांगलादेशच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. अजीत अगरकर याने सात षटकात 18 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या होत्या. हरभजन सिंह यालाही एक विकेट मिळाली होती.
पुन्हा भारत-बांगलादेश आमने सामने -
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश संघाने भारताविरोधात दमदार कामगिरी केली आहे. अनेकदा बांगलादेशचा संघ वरचढ राहिलाय. आता 19 ऑक्टोबर, गुरुवारी पुण्याच्या एमसीए मैदानात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना कोण जिंकणार? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. भारतीय संघाचे पारडे जड आहे.
हेड टू हेड -
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आतापर्यंत 40 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये 31 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. बांगलादेश संघानेही आठ सामन्यात भारताचा पराभव केला आहे. 2022 मध्ये भारताने बांगलादेशचा 227 धावांनी पराभव केला होता.