Ind vs Ban 3rd T20 : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची बिघडली तब्येत, कर्णधार सुर्याने जिंकली नाणेफेक, जाणून घ्या प्लेइंग-11
India vs Bangladesh 3rd T20I : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतलेल्या भारतीय संघाची नजर बांगलादेशविरुद्ध क्लीन स्वीपकडे असेल.
India vs Bangladesh 3rd T20I : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतलेल्या भारतीय संघाची नजर बांगलादेशविरुद्ध क्लीन स्वीपकडे असेल. ग्वाल्हेर आणि दिल्लीत खेळले गेलेले पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी रवी बिश्नोईचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर बांगलादेशने संघात दोन बदल केले आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या वर्तुळाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे हा खेळाडू मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी संघासोबत आला नव्हता.
हैदराबाद टी-20 सामन्यादरम्यान एक मोठा अपडेट समोर आला आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाची प्रकृती खालावली आहे. व्हायरल संसर्गामुळे तो मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठीही संघासोबत आला नाही. हर्षित राणाची गेल्या काही मालिकांसाठी टीम इंडियात निवड झाली असली तरी त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. या सामन्यात तो खेळताना दिसणार असल्याचे मानले जात होते, मात्र तो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी पदार्पणापासूनच मुकला आहे.
हर्षित राणा अनकॅप्ड खेळाडू
हर्षित राणाने अद्याप टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही आणि जोपर्यंत आयपीएल लिलावापूर्वी रिटेन्शन लिस्ट जाहीर होत नाही तोपर्यंत त्याच्या पदार्पणाची शक्यताही कमी आहे. अशा परिस्थितीत हर्षित राणा आयपीएलच्या पुढील हंगामातही अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार आहे. आयपीएल रिटेन्शन नियमांनुसार, सर्व संघ एकूण 6 खेळाडूंना कायम ठेवू शकतात, ज्यामध्ये एका अनकॅप्ड खेळाडूचाही समावेश करावा लागेल. अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवण्यासाठी संघाला 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत कोलकाता संघ त्याला आगामी हंगामासाठी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकतो.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.
बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, मेहदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब.