KL Rahul Ruled Out | केएल राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या उर्वरित दोन कसोटीमधून बाहेर
KL Rahul Ruled Out | मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने उर्वरित सामन्यातून माघार घेतली असून तो लवकरच भारतात परतणार आहे. सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी ही बातमी भारतीय संघासाठी काहीशी चिंतेची ठरु शकते.
बीसीसीआयने आज सकाळी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. "मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शनिवारी सरावादरम्यान फलंदाजी करताना केएल राहुलच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा अवधी लागेल. तो लवकरच ऑस्ट्रेलियाहून भारतात रवाना होईल. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत," असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं.
UPDATE: KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy. More details 👉 https://t.co/G5KLPDLnrv pic.twitter.com/S5z5G3QC2L
— BCCI (@BCCI) January 5, 2021
सलामी, मधल्या फळीत फलंदाजीसह यष्टीरक्षक भूमिका बजावणाऱ्या के एल राहुलला आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु बदलत्या परिस्थितीमुळे तो संघासाठी उपयोगी ठरला असता.
दरम्यान बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळवला जाईल.